24 जुलै 1969, म्हणजेच सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेचं अपोलो 11 अवकाशयान चांद्र मोहिम पूर्ण करून परतलं. मायकल कॉलिन्स, एडविन ऑल्ड्रिन हे पायलट आणि कमांडर नील आर्मस्ट्राँग या तीन अवकाशवीरांना फ्लोरिडातून निघून चंद्र सर करून परत यायला आठ दिवस लागले.उद्या, म्हणजे 22जुलै रोजी भारत आपलं पहिलं यान चंद्रावर पाठवेल. हे यान चंद्रावर पोहोचायला साधारणपणे सात आठवडे लागतील. अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरेल. असं असलं तरी, हा मुद्दा फक्त क्षमता आणि कौशल्याचा नसून प्राधान्यक्रमाचाही आहे.


जर्मनी, फ्रान्स, जपान अशा देशांकडे अशा अवकाश मोहिमांसाठी लागणारी तांत्रिक क्षमता असूनही, त्यांना अंतराळ आकांक्षा नाहीत किंवा तिथल्या सरकारांना करदात्यांचा पैसा अशा गोष्टींवर खर्च व्हावा असं वाटत नाही. आण्विक शस्त्रास्त्रं विकसित करण्याबाबतीतही या देशांनी निवडलेला मार्ग आपण मात्र स्वीकारलेला नाही.

चंद्राच्या अभ्यासामागचा हेतू हा आहे की, त्यामुळे आपल्या सौरमालेची निर्मिती, विकास समजून घेता येईल. चंद्र हा साडेतीन अब्ज वर्ष वयाचा आहे. चंद्रावरचे खळगे, विवरं हे वर्षानुवर्ष तसेच आहेत, कारण चंद्रावर वातावरण नसल्यानं तसंच अंतर्गत उलथापालथ होत नसल्यानं चंद्राची ही वैशिष्ट्ये होती तशीच राहिली आहेत. संपूर्ण सौरमालेत होत आलेल्या विविध आघात प्रक्रियांची नोंदच चंद्रावर झाली आहे, ज्यांच्या अभ्यासानं अनेक अशा गोष्टी पुढे येऊ शकतील ज्यांचा अभ्यास पृथ्वीवर शक्य नाही. किंबहुना, अपोलो मोहिमांमुळेच आपल्या कळलं की, एखाद्या मोठ्या वस्तूच्या पृथ्वीशी झालेल्या टक्करीनं चंद्राची निर्मिती झाली असेल.

खुद्द अमेरिकेनंही 1969च्या त्या अपूर्व घटनेनंतर आपल्या अंतराळ आकांक्षेला वेसणच घातली. आर्मस्ट्राँग आणि अल्ड्रीननंतर अन्य १० अमेरिकी अवकाशवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं, मात्र 1972 मधली मोहीम त्यांची अखेरची ठरली. 1980 च्या सुमारास रोनाल्ड रेगन अध्यक्ष असताना अमेरिकेनं स्पेस शटल कार्यक्रम हाती घेतला, जो 2011 पर्यंत चालला. 2003 मध्ये कोलंबिया स्पेस शटल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना त्याचा स्फोट होऊन भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला त्यात मृत्युमुखी पडली. स्पेस शटलबाबत 1980 नंतर घडलेली ही दुसरी दुर्घटना होती. या दुर्घटनांमध्ये 14 जणांचे जीव गेले.

30 वर्षांपूर्वी संपुष्टात आलेल्या शीतयुद्धानं आणि सोव्हिएत संघराज्याच्या पतनानं हे दाखवून दिलं की, जो प्रचंड पैसा दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या विकासासाठी खर्च होत होता (यांच्यात आणि अंतराळात जाण्यासाठी लागणाऱ्या रॉकेट्समध्ये बरंच साम्य असतं), तो अन्य ठिकाणी जाऊ लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतंच म्हणाले की, ते ‘नासा’च्या महत्वाकांक्षांना पुन्हा जागवतील आणि अमेरिकी अवकाशवीर 2024 पर्यंत पुन्हा चंद्रावर पोहोचतील. दुसरीकडे, आजच्या घडीला अंतराळ क्षेत्रात मोठं काम हे ‘स्पेस एक्स’ ही अब्जाधीश अभियंता एलॉन मस्क यांची खाजगी कंपनी करतेय.

रॉकेटच्या विविध टप्प्यातील अवशेष हस्तगत करून ते पुन्हा वापरण्यासारखी कामगिरी आज ‘स्पेस एक्स’ करतेय जी ‘नासा’लाही शक्य झालेली नाही. ‘अमेझॉन’चे मालक जेफ बेजॉस यांच्या ‘ब्लू होरायझन’ या कंपनीनंही हे तंत्रज्ञान विकसित केलंय. मस्क यांनी 2002 मध्ये जेव्हा आपली कंपनी सुरू केली, तेव्हा त्यांना जाणवलं की गेल्या 50 वर्षात रॉकेट तंत्रज्ञानात काहीच प्रगती झाली नाहीये. विविध सरकारंही 1960 पासून चालत आलेलं जुनंच तंत्रज्ञान वापरतायत. मस्क यांना मंगळावर वसाहत बनवायची आहे. त्यांची दूरदृष्टी आणि जिद्द पाहता ते आपली महत्वाकांक्षा पूर्ण करतीलही!

भारतासारखे देश जेव्हा अंतराळ कार्यक्रमांवर पैसा खर्च करतात तेव्हा त्यामागे दोन प्रकारचे विचार असतात, आणि मला वाटतं ते योग्यही आहेत. एक म्हणजे, ज्यानं सामान्य माणसाचा काही एक फायदा न होता केवळ देशाभिमान जोपासला जातो, अशा हायफाय रॉकट्सवर गरीब देशांनी पैसा वाया घालवू नये. दुसरीकडे, अशा मोहिमांमुळे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यास मदत होत, असाही विचार आहे. आता, जिथलं सरकार आपल्या जनतेला काय खावं, काय खाऊ नये...कोणत्या घोषणा द्याव्यात किंवा देऊ नये, हे सांगतं, तिथं गरज आहे ती वैज्ञानिक आणि म्हणूनच खुल्या विचारांची मनं घडवण्याची.

बहुधा यामुळेच भारतीय अवकाश कार्यक्रमाला पक्षीय मतभेदांच्या पलिकडे एकमुखी पाठिंबा आहे. उद्या झेप घेणारं चांद्रयान-2 हे 2008 साली मनमोहन सिंग यांच्या काळात मार्गी लागलं. जर चांद्रयान 2चं उड्डाण यशस्वी झालं तर ते पुढील एक वर्ष कार्यरत राहील. या मोहिमेसाठी GSLV-III हा प्रक्षेपक वापरता जातोय. ज्याची क्षमता आर्मस्ट्राँगला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या ‘सॅटर्न-V’ रॉकेटइतकी आहे. चांद्रयान 2 मधील उपग्रह 3.8 टनांचा असून तो चंद्राच्या पृष्ठभागापासून 100कि.मी. उंचीवर गोलाकार कक्षेत परिभ्रमण करत राहील. चांद्रयान 2मधील ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांची निर्मिती आपल्या ‘इसरो’नं केली आहे. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आलेला ‘विक्रम’ हा लँडर मूळ यानापासून सुटा होऊन चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरेल. त्यानंतर ‘विक्रम’मधील ‘प्रग्यान’ हा रोव्हर पुढील 14 दिवस विविध खनिजं आणि रासायनिक नमुने गोळा करील ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं शक्य होईल.

चांद्रयान-2 यशस्वी झाल्यास, भारत जगभरातल्या माध्यमांच्या हेडलाईन्समध्ये झळकेल.....किमान यंदा एका चांगल्या बातमीसाठी!

अनुवाद- प्रसन्न जोशी