मुंबईची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलचा आपण नेहमी उल्लेख करत असतो, मात्र आपल्या मुंबईची आणखी एक लाईफलाईन आहे, ती मुंबईची बससेवा अर्थात बेस्ट!
मला आठवतंय, अगदी लहानपणापासून म्हणजे शालेय वयापासून ही बेस्ट बस आमची सोबत करतेय. म्हणजे टॅक्सीने वा ट्रेननेही खरं तर पूर्वी फार क्वचित जाणं व्हायचं. तेव्हा आई-बाबांसोबत ऑपेरा हाऊस, मॅजस्टिक स्टॉपला जायचं आणि जिथे जायचं असेल तिथली बस पकडायची.
गिरगावातून जाणारा एक सर्वात लोकप्रिय आणि कायम गर्दीचा मार्ग म्हणजे ६६ नंबरची बस. बहुतांश काळासाठी डबल डेकर, तर नंतर नंतर रात्रीच्या वेळी सिंगल डेकर. प्रवाशांचा कायम राबता असलेली. बॅलार्ड पियर ते राणी लक्ष्मी चौक असा मार्ग. काळ्या पडद्यावरची ती पांढरी अक्षरं, जणू त्या काळातल्या ब्लॅक अँड व्हाईट युगाची साक्ष देणारी. लास्ट स्टॉपला म्हणजे सायन डेपोत तुम्ही उतरलात की, कधी जर त्या बसच्या इंडिकेटरवर सिंगल लाईनमध्ये लास्ट स्टॉपचं नाव लिहिलेलं असेल तर पुन्हा चेंज करण्यासाठी कंडक्टर ते हँडल रोल करायचा. या सगळ्याचं त्या काळात मी खूप निरीक्षण करायचो. त्या काळी मला आठवतंय, ६६ आणि १ नंबर या बसेस २४ तास असायच्या.
बसमध्ये कॉर्नर सीटचं तेव्हा प्रचंड आकर्षण, म्हणजे ती नाही मिळाली तर, मूडबिड जात असे असं ते वय.
बेस्टच्या कंडक्टर, ड्रायव्हरबद्दलही मला कायम कुतुहूल वाटत आलंय. म्हणजे ड्रायव्हर त्याच रुटवर कधी उन्हात, कधी पावसात न थकता बस चालवणार. तर कंडक्टर जवळपास सर्व प्रवास उभं राहून न थकता तिकीट देत राहणार. तेव्हा सुट्टया पैशांवरुन कंडक्टरशी काही प्रवाशांचे खटकेही उडालेले पाहिलेत. तर कधी, काही प्रवासी घाईने बस पकडायची, म्हणून पुढच्या दरवाज्याने बस पकडण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा मागच्या नेहमीच्या दरवाज्याने या, सांगणारा कर्तव्यदक्ष कंडक्टर, ड्रायव्हरही काही वेळा पाहिलाय. ड्रायव्हर आणि कंडक्टर ही बीईएसटी बसची आणखी दोन चाकंच जणू. म्हणजे प्रत्यक्ष टायरच्या चाकांपेक्षा हे दोघे खऱ्या अर्थाने बस ‘चालवायचे’.
दिवसाचे अनेक तास, तर काही वेळा धुवाँधार पावसातही प्रवाशांच्या मदतीला धावून जाणारे ड्रायव्हर, कंडक्टर यांच्या योगदानाची जाणीव ही ठेवायलाच हवी. काळानुरुप जसं मुंबईचं ट्रॅफिक वाढत गेलं, तसं ड्रायव्हरसमोरची आव्हानंही. चिंचोळ्या गल्ल्यांमधून, वाहनांच्या कल्लोळामधून सफाईदारपणे वाट काढणारे बस ड्रायव्हर. मुंबईतील काही गल्लीबोळ किंवा काही रस्त्यांचे टर्न इतके शार्प आहेत की, ड्रायव्हिंग स्कील पणाला लागतं. मला आठवतंय, गर्दीने भरलेली ६६ नंबरची डबल डेकर जेव्हा सेंट्रल सिनेमाला लेफ्ट टर्न घ्यायची तेव्हा एखाद्या छोट्या घाटातून आपण चाललोय असा फिल यायचा, काही वेळा फूटपाथवर बसलेले विक्रेते, त्यातच घाईने रस्ता क्रॉस कऱणारे नागरिक यांच्यातून सफाईदार टर्न घेणाऱ्या ड्रायव्हरचं परफेक्शन केवळ लाजवाब. असे खरं तर अनेक मार्ग किंवा वळणं मुंबईत असतील, मला चटकन आठवलेला अनुभव सांगितला.
तसाच अथक काम करणारा कंडक्टर. म्हणजे टिपिकल पांढऱ्या कागदावरची तिकीटं पंच करणारा. उदाहरणार्थ १.१५ अधिक ५ पैसे अधिभार अशा टाईपचा त्यावरचा मजकूर. पुढे काळानुरुप डबल डेकर बसेसची संख्या कमी झाली. एसी बसेसही आल्या. तरी खिडकी उघडून मुंबईच्य़ा पोटातून डोकावत फिरणाऱ्या नियमित बसमधल्या प्रवासाची गोडीच न्यारी.
तंत्रज्ञान प्रगत झालं तशी मग बसच्या इंडिकेटरवरील काळ्या पडद्यावरची पांढरी अक्षरं जाऊन इलेक्ट्रॉनिक अक्षरं, आकडे आले. तिकीटंही इलेक्ट्रॉनिक रोलवर आली. ऑनलाईनचा काळ सुरु झाला. काळ्या-पिवळ्या टॅक्सीसोबत खाजगी कंपन्यांच्या टॅक्सी आल्या. काळाच्या ओघात बसने जाणं थोडं कमी झालं तरी तिच्याशी नातं नाही तुटलं. तुटणारही नाही. आयुष्यात पहिल्यांदा तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात, त्या स्पेशल असतात, असं म्हणतात, बेस्ट बसच्या प्रवासाच्या अनुभवाचंही तसंच आहे. म्हणजे काळानुरुप काही बसेस रंगीत जाहिरातींनी रंगलेल्या असायच्या. तरीही ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील ती लाल रंगाची टिपिकल बस प्रवासाचा रंग आणखी खुलवते, निदान माझ्यासाठी तरी, असंच म्हणावं लागेल.
41, 61, 65, 66, 69, 126, 132, 133, 81, 82, 83, 84, 85, 88, 93 आणखी किती आकडे सांगू. हे आम्हा मुंबईकर त्यातही गिरगावकरांसाठी नुसते आकडे नाहीयेत तर, हा आमच्या आयुष्याचा काऊंटच आहे जणू.
बेस्ट बस सुरु झाल्या दिवसाची ही आठवण म्हणून मीही माझ्या आठवणींच्या चाकावर बसून आज मागच्या काळात प्रवास केला. यावेळी एक गोष्ट आवर्जून सांगेन, आमच्या आयुष्याचा पाया रचणाऱ्या शालेय वयापासून मी बसमधून प्रवास करतोय, करत राहीन. कारण, ट्रेनसारखीच ही देखील आम्हा मुंबईकरांची जीवनवाहिनीच.