जगात अनेक सकारात्मक कथा ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात. ज्यांच्या मनात नकारात्मक विचार येतात त्यांच्यासाठी अशा कथा प्रेरणादायी असतात. अशा कथा वाचल्या आणि पाहिल्या की मनात सकारात्मक विचार येतात आणि ती व्यक्ती धाडस करण्यास प्रवृत्त होते. आज याची आठवण नेटफ्लिक्सवर एक डॉक्यूमेंट्री पाहताना आली. गिर्यारोहणाच्या अनोख्या विक्रमावर आधारित या डॉक्यूमेंट्रीचे नाव आहे 14 पीक्स, नथिंग इज इम्पॉसिबल.


या डॉक्यूमेंट्रीमध्ये एक डायलॉग आहे- माणूस जन्माला येतो तेव्हाच त्याचा मृत्यूचा प्रवास सुरु झालेला असतो. याचाच अर्थ जन्माला येणारा कधी ना कधी मरणारच आहे, पण त्यापूर्वी मनात ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे. अनेकांना जे अशक्य वाटते ते एखादा सहज शक्य करून दाखवू शकतो. इतका सकारात्मक विचार या डॉक्यूमेंट्रीमध्ये आहे. चीन, तिबेट, पाकिस्तान आणि नेपाळमधील हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांमध्ये विखुरलेल्या जगातील सर्व 14 उंच पर्वतांपर्यंत फारच कमी लोक पोहोचतात. ही शिखरे गिर्यारोहकांना साद घालत असतात. काही हजार मैलांमध्ये पसरलेली शिखरं नशीब आणि कौशल्यामुळं काही गिर्यारोहक सर करतात तर काही जण अनेक प्रयत्न करूनही अयशस्वी ठरतात.


दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये, नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुर्जा नावाच्या तरुणानं ही सर्व 14 गिरीशिखरं सर करण्याचे ठरवले. पुर्जा हा गोरखा युनिटमधील सैनिक, नंतर त्याने इंग्लंडच्या सैन्यातही काम केलं. ही गिरीशिखरे फक्त सात महिन्यात सर करण्याचे कठिण आव्हान त्याने स्वतःलाच दिले. आणि विशेष म्हणजे टीमच्या मदतीने ते पूर्णही केले. जगात याअगोदर ही सर्व शिखरे सर केली होती इटालियन गिर्यारोहक रेनहोल्ड मेसनरने. मात्र ही शिखरे सर करण्यासाठी त्याला 10 वर्ष लागली होती. 1986 मध्ये त्याने शेवटचे शिखर सर केले होते. त्यानंतर आणखी एका गिर्यारोहकाने ही 14 शिखरे सर करण्यासाठी सात वर्ष घेतली होती.


14 पीक्स: नथिंग इज इम्पॉसिबल या माहितीपट पुर्जाच्या विक्रमी मोहिमेचा दस्तऐवज आहे


स्वतः पुर्जाने या संपूर्ण मोहिमेचे गोप्रो, ड्रोन आणि मोबाईल कॅमेऱ्याच्या साहाय्याने 100 पेक्षा जास्त तासांते शूटिंग केले होते. मोहिम पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पुर्जाने म्हटले होते, मी केलेला विक्रम जर एखाद्या पाश्चात्य देशातील गिर्यारोहकाने केला असता तर संपूर्ण जगाने त्याला डोक्यावर घेतले असते.


डॉक्यूमेंट्री पाहाताना निर्मल पुर्जाने घेतलेली मेहनत, सर्व शिखरे सर करताना त्याच्यापुढे असलेली आव्हाने, आलेली संकटं त्यावर त्यानं केलेली मात हा प्रवास अत्यंत उत्कृष्टतेने मांडण्यात आलेला आहे. एकदा गिर्यारोहण करीत असताना तो घसरतो आणि 100 फूट खाली कोसळतो पण त्याचवेळेला त्याला एक दोर सापडतो आणि तो वाचतो. तर शेवटच्या टप्प्यात चीन त्याला एका शिखरावर चढाई करण्याची परवानगी देत नाही. तेव्हा तो राजकीय आणि सामाजिक दबाव कसा तयार करतो हे उत्कृष्टतेने दाखवण्यात आलेले आहे. या संपूर्ण प्रवासात त्याचे कुटुंबीय त्याच्या पाठीशी असते.


ब्रिटीश दिग्दर्शक टॉर्किल जोन्स यांनी पुर्जाची कथा रुपेरी पडद्यावर मांडण्याचे ठरवले. त्यांनी पुर्जाच्या 18 महिन्यांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्याचे ठरवले. पुर्जाने शूट केलेल्या 100 तासांहून अधिक फुटेजमधून त्यांनी काही दृश्य संपादित केली आणि ती नेटफ्लिक्सला दाखवली. नेटफ्लिक्सने लगेचच त्याला डॉक्यूमेंट्री बनवण्याची परवानगी दिली आणि त्यातून तयार झाला 14 पीक्स, नथिंग इज इम्पॉसिबल. या डॉक्यूमेंट्रीने जगभरातील चित्रपट महोत्सवामध्ये वाहवा मिळवली. सर करण्यास अशक्यप्राय असलेल्या या शिखराला हिमस्खलनात टिकून राहण्यात सकारात्मक विचारसरणीच्या उपयोग झाल्याचे पुर्जा म्हणतो.


एका मुलाखतीत पुर्जाने म्हटले, मोठी स्वप्ने पाहायला घाबरू नका. जो कोणी हा चित्रपट पाहिल तो सकारात्मक ऊर्जे नक्कीच भरून जाईल. एखादी गोष्ट अशक्य आहे हे सांगणारे तुम्ही कोण आहात? मला वाटते की, तुमच्या मुलांना एखादी गोष्ट अशक्य आहे हे सांगणे नेहमीच खरे नसते. जे सकारत्मक विचार करतात अशा लोकांसाठी ही डॉक्यूमेंट्री आहे. तुम्हाला एखादी आवड असेल तर त्यासाठी 100 टक्के झोकून द्या. तुम्ही यशस्वी व्हाल. मला जगाला हेच दाखवायचे होते की काहीही अशक्य नाही.


ही डॉक्यूमेंट्री पाहाताना त्याच्या या उद्गारांची सत्यता पटू लागते.


त्यामुळे नेटफ्लिक्सवरील जवळ-जवळ पावणे दोन तासांची ही डॉक्यूमेंट्री अवश्य पाहावी...