मुंबई : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3.01 ते 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.37 मिनिटापर्यंत गणेश स्थापनेचा मुहूर्त आहे. या दरम्यान देशभरातील घरांघरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा-अर्चा केली जाणार आहे. पण गणेशाचे आगमन होताना त्यावेळी चंद्रदर्शन करू नये असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन हे अशुभ मानलं जातं. त्यामागचं कारणही तसंच आहे. 


रागाच्या भरात गणेशाने चंद्राला शाप दिला


पौराणिक कथेनुसार एके दिवशी भगवान गणेश आपले वाहन असलेले मुषक म्हणजे उंदरावर स्वार होऊन फिरायला गेले होते. त्यावेळी अचानक उंदीर अडखळला. ते पाहताच चंद्राला हसू अनावर झाले. चंद्राच्या या कृतीवर गणेश क्रोधित झाले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला. 


भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहेल त्याच्यासमोर संकट उभं राहील. त्याच्यावर गणेशाची कृपा होणार नाही. तसेच त्याच्यावर खोटे आरोप केले जातील असा शाप गणेशाने दिला. 


चतुर्थीला चंद्रदर्शन हे अशुभ


धार्मिक शास्त्रांच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्राचे दर्शन करून नये. त्या दिवशी जर तुम्ही चंद्र पाहिला तर तुमच्यावर खोटा आरोप ठेवला जाऊ शकतो किंवा तुमच्यासमोर एखादं संकट उभं राहू शकतं.  


चुकून चंद्र दिसला तर काय करावं? 


गणेश आगमनाच्या वेळी चुकून जर चंद्र दिसलाच, किंवा अनवधानाने त्याच्याकडे आपण पाहिलंच तर घाबरून जायचं कारण नाही. त्यावरही उपाय सांगितला आहे. चुकून जर चंद्र पाहिला तर भक्ताने गणेशाचे नमन करावं. त्या दिवशी गणपतीच्या मंत्राचा जप करावा किंवा गणेश अथर्वशीर्ष पठण करावं. 


गणेशाच्या या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीने चतुर्थीचे व्रत ठेवावे असंही शास्त्रात सांगितलं आहे.


ही बातमी वाचा: