Vinayak Chaturthi 2024 : हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकंष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) व्रत पाळलं जाते. यावर्षी आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी मंगळवारी, 9 जुलै रोजी येत आहे. या दिवशी गणपती आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी गणपतीची पूजा करतो, त्याच्या सर्व अडचणी दूर होतात. त्यानुसार विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधीचा असणार आहे या संदर्भात जाणून घेऊया.
विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त (Vinayak Chaturthi 2024 Muhurta)
चतुर्थी प्रारंभ - 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी
चतुर्थी समाप्ती - 10 जुलै रोजी 7 वाजून 51 मिनिटांनी
उदय तिथीनुसार, 9 जुलै रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल.
पूजेचा शुभ मुहूर्त - पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 3 मिनिटं ते दुपारी 1 वाजून 50 मिनिटापर्यंत आहे. पूजेचा एकूण कालावधी 2 तास 40 मिनिटांचा आहे.
आषाढी विनायक चतुर्थीचे शुभ योग (Ashadhi Vinayak Chaturthi Shubh Yog)
विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी अंगारक योग, रवियोग, सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे शुभ योग तयार होत आहेत. विनायक चतुर्थीला रवि योग सकाळी 7 वाजून 52 मिनिटं ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 31 मिनिटापर्यंत आहे. तर सर्वार्थ सिद्धी योग पहाटे 5 वाजून 30 मिनिटे ते 7 वाजून 52 मिनिटापर्यंत आहे. आश्लेषा नक्षत्र देखील सकाळी 7 वाजून 52 मिनिटापर्यंत आहे. त्यानंतर मघा नक्षत्र असेल.
विनायक चतुर्थी पूजा विधी (Vinayak Chaturthi Puja Vidhi)
सकाळी लवकर उठावं. देवघर स्वच्छ करुन देवपूजा करावी. गणपतीला जलाभिषेक करा. बाप्पाला फुलं, फळं अर्पण करून पिवळं चंदन लावा. मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आषाढी विनायक चतुर्थी व्रताची कथा वाचा. ॐ गणपतये नमः या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणपती बाप्पाची आरती करा. शक्य झाल्यास जवळच्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्या. चंद्राला अर्घ्य अर्पण करा. शक्य असल्यास उपवास करा, यादिवशी मांसाहार करू नका.
चंद्रोदयाची वेळ
विनायक चतुर्थी, 9 जुलै रोजी असून, चंद्रोदय सकाळी 8:25 वाजता होईल आणि चंद्रास्ताची वेळ रात्री 9:58 वाजता असेल. या दिवशी चंद्र पाहणं निषिद्ध मानलं जातं, कारण चंद्राकडे पाहिल्यास खोटा कलंक लागतो असं म्हणतात.
विनायक चतुर्थी उपाय (Vinayak Chaturthi Remedies)
पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करावं. अर्घ्य देताना व्रत करणाऱ्या व्यक्तीने डोळे मिटून गणेश मंत्रांचा जप करावा आणि सुख-समृद्धीची कामना करावी. गणेशाच्या पूजेच्या वेळी पती-पत्नीने एकत्र बसून 'ॐ वक्रतुंडय नम:' या मंत्राचा जप केल्यास ते अत्यंत शुभ मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :