Vidhan Sabha Elections 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. यानंतर अर्ध्या नेत्यांची धाकधूक वाढली, तर अर्धे नेते रिलॅक्स मोडमध्ये आहेत. यापैकीच एक म्हणजे, बच्चू कडू. मतदानानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) रिलॅक्स झाले आहेत, ते सध्या त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. यावेळी तिसऱ्या आघाडीचे 25 ते 30 जागा टफ फाईटमध्ये आहे, पण आमच्या प्रहारच्या 10 जागा निवडून येतील, असा विश्वास प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
मतदानानंतर बच्चू कडूंचा रिलॅक्स मोड ऑन
अचलपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बच्चू कडू सध्या त्यांच्या कुरळ पूर्णा गावी आहेत. त्या ठिकाणी बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी डॉ. नयना कडू हे दोघे बऱ्याच दिवसांनी गप्पा मारताना दिसले. बच्चू कडू हे महिनाभर सतत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात प्रचार करताना दिसले. इतकंच नाही, तर बाहेर जिल्ह्यात सुद्धा त्यांना जावं लागलं. यावेळी बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती म्हणून तिसरी आघाडी उभी केली आहे.
आमच्याशिवाय सरकार बसणार नाही - बच्चू कडू
कोणत्याही पक्षाजवळ बहुमत राहणार नाही, मात्र अमच्याशिवाय सरकार बसणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. आर्वी येथे जयकुमार बेलखडे या प्रहारच्या उमेदवारासाठी आर्वी येथे सभा घेण्यात आली होती. यावेळी बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 122 जागा उभ्या केल्या, त्यात 40 जागा प्रहारच्या आहे. त्यातल्या त्यात प्रहार 10-15 जागावर दणका ठेवणार आहे. त्यात आर्वीचा समावेश असल्याचंही ते म्हणाले.
आता प्रजेचं राज्य निर्माण करावं लागेल - बच्चू कडू
पक्ष मोठा नाही, तर कार्यकर्ता हा पक्षाला मोठा करतो, अनेक गोष्टी धर्म आणि जातीच्या नावावर पेटवल्या जातात. मात्र मित्रहो हे नामर्दांची औलाद आहे, हे धर्म आणि जातीशिवाय निवडून येत नाही. पन्नास वर्षे काँग्रेस, तर पंधरा वर्षे भाजप सत्तेत राहिली, महाराष्ट्रात काय बदल झाला. आजही तलाठी छाती ठोक आमच्यासमोर उभा असतो. प्रजेचं राज्य नाही तर कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांचं राज्य आहे. आमचं राज्य संपलं आता प्रजेचं राज्य निर्माण करावं लागतंय, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
हेही वाचा: