Vat Purnima 2024 : हिंदू धर्मग्रथांनुसार, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. वटपौर्णिमेला (Vat Purnima) वटसावित्री असं देखील म्हणतात. आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं, त्याला उदंड आयुष्य लाभावं यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतता.
खरंतर, वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक गोष्टींची तयारी केली जाते. जसे की, वडाच्या झाडाला फेऱ्या घालणे, पूजेचं साहित्य तयार करणे, वडाच्या झाडाला धागा गुंडाळणे. यांसारख्या अनेक रूढी-परंपरांचा समावेश असतो.
वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त (Vat Purnima 2024 Shubh Muhurta)
वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे.
वटपौर्णिमेसाठी लागणारे पूजा साहित्य
दोन हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पान, सुपारी, पैसे, गूळ -खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, देवीचा फोटो किंवा सुपारी इ.
वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेची पद्धत
ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ज्या महिलांनी उपवास ठेवला आहे त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतरच व्रताची सुरुवात करावी. तसेच, या दिवशी श्रृंगार करावा. पूजेचं साहित्य तयार करावं. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाला, फुले, वाण, पाणी देऊन त्याभोवती फेरे घालावे. आणि पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
वडाच्या झाडाला सूत का गुंडाळतात?
धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षाच्या खोडात असलेल्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. वट पौर्णिमेच्या पूजे दरम्यान, जेव्हा महिला वटवृक्षाच्या खोडाला सूत गंडाळतात त्यावेळी जिवाभावाने खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी आणि आग या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात. अशी मान्यता आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सूत गुंडाळले जाते अशी मान्यता आहे.
वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला 'अक्षयवत' असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: