Vaishakh Snan 2024 : हिंदू धर्मात वैशाख महिन्याला आणि वैशाख स्नानाला विशेष महत्त्व आहे. वैशाख महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख महिन्यातील स्नानाला (Vaishakh Snan) महत्त्व आहे. याशिवाय धार्मिक (Religion) कार्याच्या दृष्टीनेही हा महिना खूप पवित्र आणि उत्तम मानला जातो.


वैशाख स्नान नेमकं कधी? 


चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) ते वैशाख पौर्णिमेपर्यंत (बौद्ध पौर्णिमा) वैशाख स्नान केलं जातं. यंदा वैशाख स्नान 23 एप्रिलपासून सुरू झालं आहे आणि ते 23 मे पर्यंत चालणार आहे. वैशाख स्नानाच्या काळात दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे. वैशाख महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने, पूजा केल्याने पुण्य लाभते, मोक्ष प्राप्त होतो.


वैशाख स्नान ब्रम्ह मुहूर्तावरच का केलं जातं?


स्कंदपुराणात वैशाख महिन्याचं वर्णन सर्वात श्रेष्ठ महिना असं केलं जातं. वैशाख महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करून उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि तो व्यक्ती पुण्यवान बनतो, असं पुराणात सांगितलं आहे. वैशाखात स्नान केल्यावरच राजा महिरथला वैकुंठलोकाची प्राप्ती झाल्याचं पुराणात वर्णन आहे. वैशाखात पवित्र नद्यांमध्ये अंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे.


अंघोळीनंतर सूर्याला द्या अर्घ्य


वैशाखात अंघोळ करुन सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. वैशाख महिन्यात हा क्रियाकल्प सुरू ठेवल्याने जीवनातील अडचणींपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते आणि व्यक्तीला अपेक्षित परिणाम मिळतात.


सूर्याला अर्घ्य देताना भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे नामस्मरण करा. विष्णू सहस्रनामाचं पठण करा. महिनाभर वैशाख महात्म्याची कथा ऐका. तुळशीसह इतर झाडं आणि वनस्पतींची काळजी घ्या. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. वैशाख स्नान करणाऱ्या व्यक्तीने संपूर्ण महिना एकाच वेळी अन्नग्रहण करावं.


वैशाख महिन्यात काय करावं?



  • या महिन्यात जलदान करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही रस्त्याच्या कडेला पाणपोईची व्यवस्था करू शकता. पशु-पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकता.

  • वैशाख महिन्यात गरजूंना फळं, नवीन कपडे दान करा.

  • वैशाख महिन्यात दररोज विष्णुसहस्रनामाचं पठण करावं. यामुळे जीवनात सुख, शांती, संपत्ती प्राप्त होते.

  • या महिन्यात भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते. देवी लक्ष्मीला लाल गुलाबाचं फूल किंवा कमळाचे फूल जरूर अर्पण करा, यामुळे अपार संपत्ती लाभते.

  • वैशाख स्नानाच्या शेवटी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी नद्यांमध्ये दिवे सोडण्याचं विशेष महत्त्व आहे.


वैशाखात या गोष्टी करू नका


स्कंद पुराणानुसार, वैशाख महिन्यात काही कामं करणं निषिद्ध मानलं जातं, अशा गोष्टी करणं टाळावं. वैशाख महिन्यात तेलाने मालिश करणं, दिवसा झोपणं, दिवसातून दोनदा जेवणं, सूर्यास्तानंतर जेवण करणं वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे या गोष्टी टाळाव्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Rajyog : तब्बल 50 वर्षांनंतर बनले 'लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोग'; 'या' 3 राशींना मिळणार अपार पैसा, पद आणि प्रतिष्ठा