Shravan Somvar 2025: आजचा दिवस खास आहे, कारण आज श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आहे. जसं की आपल्याला माहित आहे, की भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी एक अद्भूत ज्योतिर्लिंग असे आहे. ज्याच्या स्पर्श दर्शनाचे महत्त्व मोठे आहे, ज्यामुळे या ठिकाणी भाविकांचा ओढा नेहमीच पाहायला मिळतो. ते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड येथील परळी येथे आहे. या ठिकाणी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. ज्योतिर्लिंग असल्या कारणाने धार्मिकदृष्ट्या या ठिकाणाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. पुराणांत सुद्धा परळीच्या वैद्यनाथांचा उल्लेख आहे. आज श्रावण सोमवार निमित्त जाणून घेऊया...
द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात उल्लेख..
आद्य शंकराचार्यांनी रचना केलेल्या द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात स्पष्टपणे 'परल्यां वैद्यनाथं च' असा परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. त्याचबरोबर स्वतः आद्य शंकराचार्यांनी बारा ज्योतिर्लिंग यात्रा केली होती. यादरम्यान ज्योतिर्लिंग म्हणून आद्य शंकराचार्य हे परळी वैजनाथ येथे दर्शन घेऊन, भेट देऊन गेल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. श्रृंगेरी येथील शंकराचार्य मूळ पिठामध्ये आजही आद्य शंकराचार्य परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आल्याची नोंद आहे.
- आद्य शंकराचार्य स्तोत्र -
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् ।सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः ।सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
महाशिवरात्री आणि श्रावणात मोठी गर्दी
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट कडून वर्षभरात गुढीपाडवा,विजयादशमी,मकरसंक्रांती, महाशिवरात्री या सणांच्या दिवशी अलंकारिक महापूजेची आरास केली जाते. महाशिवरात्र आणि दसऱ्यानंतर निघणाऱ्या पालखी सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी होते. महाशिवरात्री आणि श्रावण पर्वात दर्शनासाठी भाविक वर्ग मोठ्या संख्येने परळी वैजनाथ येथे दाखल होत असतो.भाविकांना परळीत येण्यासाठी रेल्वेची सोय असल्याने येथे थेट पोहोचता येते, तसेच अनेक महामार्गही परळीत येतात
कशी आहे वैद्यनाथ मंदिराची वास्तुरचना?
मान्यतेनुसार परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे 2000 वर्षे जुने आहे.मंदिराचे बांधकाम करण्यासाठी 18 वर्षे लागली असे सांगितले जाते.परळीपासून जवळ असलेल्या त्रिशूला देवी पर्वत रांगेतून काही खास दगड आणले गेले याच दगडातूनच जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आले होते.पूर्वेकडे तोंड करून मंदिराला दक्षिण आणि उत्तर दिशांना दोन दरवाजे आहेत.मंदिराच्या परिसरात एक मोठा सागवान अखंड लाकडाचा हॉल आणि प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त प्रदक्षिणा आवार आहे.धार्मिक महत्व असलेले तसेच मंदिराचे सौंदर्य वाढवणारे दोन तीर्थ आहेत मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते.त्रिकाल दर्शना मुळे तीन नंदीचे वास्तव्य असल्याने या गाभाऱ्यात तीन नंदी आहेत
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला जिर्णोद्धार
हे ज्योतिर्लिंग एका टेकडीवर असून वर चढण्यासाठी पायर्याही बनविल्या आहेत. या ज्योतिर्लिंग मंदिराचा स्वत: इंदूरच्या महारानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार केलेला आहे.मंदिराजवळच शिवकुंड बांधलेले आहेत.वैद्यनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे,असे म्हणतात.
परळीच्या प्राचीन नावाचे अनेक संदर्भ
वैजनाथ मंदिराभोवती डोंगर जंगल आणि नद्या,उपयुक्त औषधी वनस्पतींनी परिपूर्ण आहेत. म्हणूनच प्राचीन काळात परळीचे एक नाव वैजयंती असे आहे. परळी ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ असेही म्हणतात. येथेच भगवान विष्णूंनी देवांना अमृत प्राप्त करण्यास यशस्वीपणे मदत केली.त्यामुळे या ठिकाणाला 'वैजयंती' असेही म्हणतात. कांतीपूरी असेही परळी वैजनाथ क्षेत्राचे प्राचीन नाव आहे वैद्यांनाथाच्या आरतीत याचा उल्लेख आहे.
स्पर्श दर्शनाचे महत्त्व, इथे पार्वतीसह भगवान शंकराचा निवास
वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनाने सर्व बाधा दूर होतात अशी भाविकांची नितांत श्रद्धा आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी वैजनाथ हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे ज्याचे स्पर्श दर्शन महत्त्वाचे समजले जाते.या ज्योतिर्लिंगात अमृत असल्यामुळे ही आरोग्य प्रदान करणारी देवता आहे.अमृत व धन्वंतरी दोन्हींचाही वास या शिवलिंगात असल्याने या ज्योतिर्लिंगास वैद्यनाथ नाव प्राप्त झाले आहे.त्यामुळेच परंपरेप्रमाणे या ठिकाणी स्पर्श दर्शनाची रीत आहे.
समुद्रमंथनातून अमृत याच शिवलिंगात लपवले!
देव दैत्यांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. त्यापैकी धन्वंतरी आणि अमृत हे दोन रत्न होती. जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले, तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत याच वैजनाथ शिवलिंगात लपवले. राक्षसांनी जेव्हा शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या.पण,जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला,तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला.अशी मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे.अमृतयुक्त असल्यामुळेच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ आरोग्याची देवता असे म्हणतात.
प्रभू वैजनाथांबद्दल अनेक आख्यायिका
वैद्यनाथ मंदिराबरोबर अनेक आख्यायिका जोडलेल्या आहेत. अशीच एक सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे जी परळी येथे घडली असे म्हणतात.मार्कंडेयाला वैद्यनाथाकडून जीवनाचे वरदान मिळाले. ही कथा शिवपुराणातील आहे,त्यांच्या नावावरून परळी वैजनाथ येथील एका तीर्थाला मार्कंडेय तीर्थ नाव देण्यात आले आहे.
हेही वाचा :
August 2025 Astrology: ऑगस्टमध्ये 'या' 6 राशींच्या नोकरीचं टेन्शन संपेल! प्रमोशन, पगारात घसघशीत वाढ, तुमची रास कोणती? ज्योतिषी म्हणतात.