Pakistani Tiktok Star Sumeera Rajput Found Dead In Home: पाकिस्तानमध्ये (Pakistan) आणखी एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची संशयास्पदरित्या हत्या करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये टिकटॉक स्टार सना युसूफची (Tiktok Star Sana Yousaf) गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आता टिकटॉक स्टार आणि इन्फ्लुएंसर सुमिरा राजपूतची (Tiktok Star Sumeera Rajput) हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. सिंधमधील घोटकी जिल्ह्यातील बागो वाह भागात सुमिरा राजपूतचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आला. दरम्यान, तिच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा इन्फ्लुएंसरच्या मुलीनं केला आहे.
पाकिस्तानी टिकटॉक कंटेंट क्रिएटर सुमिरा राजपूतचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सिंधमधील घोटकी जिल्ह्यातील बागो भागात टिकटॉककर सुमिराचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला. मीडिया रिपोर्टनुसार, काही लोकांनी सुमिराला विष देऊन मारल्याचा आरोप तिच्या मुलीनं केला आहे. काहीजण तिच्यावर जबरदस्तीनं लग्न करण्यासाठी दबाव आणत होते, अशीही माहिती समोर आली आहे.
सुमिरावर विषप्रयोग?
जिओ न्यूजनुसार, सुमिरा राजपूतला 15 वर्षांची मुलगी आहे, जी एक टिकटॉक क्रिएटर देखील आहे. मुलीनं आरोप केला आहे की, काही लोकांनी सुमिरावर विषप्रयोग केला. तिला विषाच्या गोळ्या दिल्या, ज्यामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला. सुमिरा राजपूत ही पाकिस्तानातील एक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर होती, तिचे टिकटॉकवर 58,000 हून अधिक फॉलोअर्स आणि दहा लाखांहून अधिक लाईक्स होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमिरा राजपूतच्या कथित हत्याप्रकरणी पोलिसांनी बाबू राजपूत आणि मोहम्मद इम्रान या दोघांना ताब्यात घेतलंय. घोटकीचे जिल्हा पोलीस अधिकारी अन्वर शेख यांनी मृत सुमिरा राजपूतच्या मुलीनं केलेल्या दाव्याला दुजोरा दिला आहे, पण अद्याप याप्रकरणी कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. यामध्ये काही गैरप्रकार आहे का? याचा तपास पोलीस अधिकाऱ्यांकडून सध्या सुरू आहे.
दरम्यान, घोटकीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) मुहम्मद अन्वर खेतान म्हणाले की, "सुमिरा राजपूतचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आहे, ज्यामध्ये विषबाधेमुळे तिचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे."
पाकिस्तानात कंटेंट क्रिएटर्सवरील हिंसाचार का वाढतोय?
पाकिस्तानात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणींवरील वाढता हिंसाचार, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. जिओ न्यूजनुसार, गेल्या महिन्यात 17 वर्षीय टिकटॉक स्टार सना युसूफची इस्लामाबादमधील तिच्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी उमर हयातला अटक केली. पाकिस्तानमध्ये अशा घटनांमुळे तरुणींच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :