Shiv Jayanti 2024 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ आणि शहाजी राजेंच्या घरात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी भोसले होतं. संपूर्ण देशात मुघलांची सत्ता होती त्या काळी शिवरायांचा जन्म झाला आणि त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. 


महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti) साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती 19 फेब्रुवारीला असते. या दिवशी देशभरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह असतो.


छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj 394th Jayanti 2024)


यंदा 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी केली जात आहे. राज्य सरकारकडून 19 फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन केलं जातं. दरवर्षी शिवप्रेमी मोठ्या आतुरतेने आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट पाहत असतात. 


शिवजयंतीचा इतिहास (Shiv Jayanti History)


वैभव, शौर्य, दया आणि औदार्य यांचं प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 1870 पासून साजरी करण्यास सुरुवात झाली. सर्वात आधी पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला. पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी आपल्या लाडक्या राजाची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.


लोकमान्य टिळक त्या काळात जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुध्द लढा देत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जावी, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती आणि शौर्य देशातील तरुणांना आणि जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. परंतु, आता शिवजयंती फक्त देशातच नव्हे, तर विदेशातही साजरी केली जाते.


शिवाजी महाराजांचं पहिलं युद्ध


शिवाजी महाराजांनी अवघ्या 15 वर्षांच्या वयात हिंदू साम्राज्यासाठी पहिलं युद्ध लढलं. हिंदू संकटात असताना महाराजांनी आपली शूर कामगिरी दर्शवली. शिवाजी महाराजांनी विजापूरवर हल्ला केला. कुशल रणनीती आणि गनिमी काव्याचा युद्धात उपयोग करून त्यांनी विजापूरच्या आदिलशाहाला मारलं.


हेही वाचा:


February : चार वर्षातून एकदा येते 29 फेब्रुवारी; यंदा हा दिवस अतिशय शुभ, ग्रह-नक्षत्रांचा बनतोय विशेष योग