Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्यायदेवता आणि सर्वात क्रूर ग्रह म्हटलं जातं. शनीची (Lord Shani) साडेसाती, ढैय्या किंवा महादशा यांचं नाव ऐकताच भीतीची भावना निर्माण होते. शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्याचबरोबर, शनी सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह असल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव सर्वात जास्त काळ राहतो.
शनी चांगलं काम करणाऱ्यांना शुभ परिणाम देतो तर जे वाईट कर्म करतात त्यांना शिक्षा देखील देतो. आज आपण याच शनीच्या महादशेबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या अशुभ परिणामांनी लोकांना फार कष्ट करावे लागतात तर शुभ परिणामांनी राजासारखं आयुष्यही जगतात. शनीच्या महादशेचा प्रभाव किती काळ असतो ते जाणून घेऊयात.
19 वर्षांपर्यंत असते शनीची महादशा
शनीची महादशा तब्बल 19 वर्षांपर्यंत असते. या दरम्यान, सर्व शुभ आणि अशुभ ग्रहांची अंतर्दशा होते. त्याचबरोबर प्रत्यंतर दशा देखील चालते. महादशेच्या दरम्यान अंतर्दशाचे वेगवेगळे फळ मिळतात. जर, तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती अशुभ असेल तर शनीच्या महादशेचा लोकांवर फार वाईट परिणाम होतो.
शनीच्या महादशेसाठी करा 'हे' उपाय
जर तुम्हाला शनीच्या महादशेच्या दरम्यान त्याच्या क्रूर दृष्टीपासून स्वत:चं संरक्षण करायचं असेल तर यासाठी काही उपाय करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर, शनीला नाराज करतील अशी कार्य या काळात करू नयेत.
- शनीच्या महादशेच्या दरम्यान कोणतंही धार्मिक कार्य करू नये. तसेच, अधर्माच्या मार्गावरही चालू नये. खोटं बोलणे, धोका देणे, मदयपान यांसारख्या सवयींपासून दूर राहावे.
- ज्येष्ठ व्यक्ती, गरजू लोक आणि लहान मुलांना दु:ख देऊ नये. त्यांचा अपमान करू नये. या व्यतिरिक्त गरजू लोकांची मदत करावी.
- शनीची कृपा हवी असेल तर आपल्या आई-वडिलांची सेवा करा. त्यांचा आदर करा.
- प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
- पूजेच्या वेळी शनी स्त्रोताचं पठण करा.
- शनीच्या मूर्तीसमोर उभे राहू नका. तसेच, शनीच्या डोळ्यांमध्येसुद्धा सरळ बघू नका.
- शनिवारच्या दिवशी काळे तीळ, चामड्याची चप्पल यांसारख्या गोष्टींचं दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :