Maha Kumbh 2025 : प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दररोज दाखल होतायत. कुंभमेळ्यात अनेक साधू, साध्वी आणि महंतांनी तंबू ठोकले आहेत. पण कुंभमेळ्यातल्या एका साध्वीनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सोशल मीडियावर ती सध्या प्रचंड लोकप्रिय झालीये. या साध्वीचं नाव हर्षा रिचारिया असं आहे. तिच्या सौंदर्यामुळे कुंभमेळ्यात तिचीच सर्वाधिक चर्चा आहे, मात्र साध्वी हर्षाच्या एका कृत्यावर साधू-संत चांगलेच भडकलेत.


हर्षा यांनी पहिले अमृत स्नान केल्याने वाद


मॉडेल साध्वी हर्षा यांना महाकुंभातील पहिले अमृत स्नान करु देणे आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं की, महाकुंभात ही परंपरा सुरू करणं पूर्णपणे चुकीचं आहे. ही विकृत मानसिकता आहे.


'साध्वी हर्षांचं शाही रथावर बसणं पूर्णपणे चुकीचं'


शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, महाकुंभात चेहऱ्याचं सौदर्य नाही, तर ह्रदयाची सुंदरता पाहिली जावी. मनाची सुंदरता पाहिली जावी. ज्या व्यक्तीने अजून संन्यास घ्यावा की लग्न करावं, हे निश्चित केलं नाही, त्यांना संत-महात्मांच्या शाही रथावर स्थान देणंही चुकीचं आहे. भक्त म्हणून त्यांचा सहभाग ठीक आहे, पण भगवे कपडे परिधान करुन शाही रथावर बसणं पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या प्रमाणे पोलिसांचा गणवेश केवळ पोलीस दलात सहभागी असणाऱ्यांना मिळतो, तसे भगवे वस्त्र फक्त संन्यासींना मिळते.


अमृत ​​स्नान केल्यावर हर्षा काय म्हणाली?


अमृत ​​स्नान केल्यानंतर हर्षाने सांगितलं की, त्यांना दैवी अनुभव येत आहे. साध्वी हर्षा रिचारिया यांनी साध्वी म्हणण्यावर आक्षेप व्यक्त केला आणि कोणालाही आश्चर्य वाटेल असं उत्तर दिलं. सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांनी निश्चितपणे आपल्या गुरूंकडून दीक्षा घेतली होती, परंतु सध्या ती संन्यास घेण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेऊ इच्छित नाही, असं हर्षाने सांगितलं.


मॉडेलिंग आणि अभिनयाचं झगमगतं जग सोडून महाकुंभात


सोशल मीडियावर हर्षाबद्दल प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. मॉडेलिंग आणि अभिनयाचं झगमगतं जग सोडून हर्षानं साध्वी होण्याचा मार्ग कसा पत्करला, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पण आपण केवळ दीक्षा घेतलीय, साध्वी बनलो नसल्याचं स्पष्टीकरण हर्षानं दिलंय. सोशल मीडियावर हर्षाचे मॉडेलिंग आणि अँकरिंगशी संबंधित फोटो आणि पोस्ट आहेत. एकंदरीत ३० वर्षांची हर्षा कुंभमेळ्याच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलीय, हे मात्र नक्की.


हेही वाचा:


Maha Kumbh 2025 : कसं बनतात नागा साधू? कुंभमेळ्यानंतर हे साधू कुठे गायब होतात? जाणून घ्या रहस्यमय जीवन