Valentine Week 2024: 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डे (Valentine's Day) असला तरीही त्याची सुरूवात आजपासून म्हणजे एक आठवडा आधीपासूनच होते. त्यामुळे अनेकजण या व्हॅलेंटाईन वीकची (Valentine's Week) आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीच्या रोज डे (Rose Day) पासून होते तर शेवट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ने होते. आजचा बुधवार रोज डे अर्थात गुलाब दिवसाच्या स्वरुपात साजरा केला जातो.
गुलाबाकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. प्रेम व्यक्त करण्यासाठी, सत्कार तसेच स्वागत करण्यासाठी गुलाबाच्या फुलाचा वापर होतो. परंतु गुलाबाच्या फुलाचे धार्मिक महत्त्व देखील आहे. पूजा करताना गुलाबाची फुले देवाला अर्पण केली जातात. पुजेच्या वेळी फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. आपली आवडती फुले देवाला अर्पण केल्याने देव प्रसन्न होतो. जाणून घेऊया कोणत्या देवी-देवतांच्या पूजेमध्ये गुलाबाचे फूल अर्पण केले जाते.
गुलाबाच्या फुलाचे महत्त्व काय?
कोणतीही पुजा फुलांशिवाय पूर्ण होत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार गुलाबाची फुले अनेक देवी-देवतांना आवडतात. विशेषत: भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पुजेमध्ये गुलाबाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. गुलाबाच्या फुलाचा सुगंध शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि लाल रंगाचे गुलाबाचे फुल मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार ताजे गुलाबाचे फूल खोलीत ठेवल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नात्यात प्रेम वाढते. तसेच गुलाबाचे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे चांगले मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आर्थिक समृद्धी वाढते.
कोणत्या देवाला आवडते गुलाबाचे फुल?
हनुमानाला गुलाबचे फुल अतिशय प्रिय आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत लाल गुलाबाचे फुल वाहिल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच भगवान शंकराला पांढऱ्या रंगाचे फुल अर्पण करावे. दुर्गा मातेला देखील गुलाबाचे फुल प्रिय आहे. तसेच लक्ष्मी मातेला कमळाबरोबर गुलाबाचे फुल अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी देवीला फुल वाहिल्याने घरात सुख समृद्धी येते. भगवान श्रीकृष्णाला देखील गुलाबाचे फुल आवडते. कृष्णाला फुल वाहिल्याने परिवारातील कलह दूर होतील. भगवान विष्णूच्या पुजेमध्ये गुलाबाच्या फुलांचा वापर करण्यात येतो.
देवाला गुलाबाचे फुल वाहताना ही काळजी घ्या?
- देवाला गुलाबाचे फुल वाहताना गुलबाच्या देठाला काटे नसले पाहिजे.
- पुजेला कधीही काळ्या रंगाचे फुल वाहू नये. काळ्या रंगाचे फुल अतिशय अशुभ मानले जाते.
- पुजा करताना नेहमी ताज्या फुलांचा वापर करावा. कधीही कोमजलेले फुल देवाला वाहू नये
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)