Ayodhya Ram Murti : अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. रामललाच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभ मुहूर्तावर झाली. राम मंदिरात श्रीरामाची 5 वर्षांची बाल स्वरुपातील मूर्ती विराजमान झाली आहे. या. गर्भगृहात स्थापन केलेल्या मूर्तीची उंची 51 इंच आहे आणि काळ्या रंगात ही मूर्ती आहे.


आता मंदिरात बाल स्वरुपातील मूर्तीच का स्थापित केली गेली? नेमकी 5 वर्षाच्याच बालस्वरुपातील रामाची (Ram) मूर्ती का? मोठेपणीची किंवा त्याहून लहानपणीची मूर्ती का नाही? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर प्रभू श्रीरामाची बाल स्वरुपातील मूर्ती बसवण्यामागचं खास कारण जाणून घेऊया.


राम मंदिरात 5 वर्षीय बाल स्वरुपातील मूर्तीच का?


हिंदू धर्मात 5 वर्षापर्यंतचं वय बालपण मानलं जातं, यानंतरच्या वयात मुलांना सुबुद्ध मानलं जातं. चाणक्य नितीप्रमाणे आणि इतर विद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे, पाच वर्षापर्यंत मुलाची प्रत्येक चूक माफ केली जाते, कारण तेव्हा ते बाल वयात असतात, तेव्हा ते निर्दोष असतात. पाच वर्षांपर्यंत मुलांना कसलीही समज नसते, त्या वयापर्यंत त्यांना शिकवण्याचं काम करावं. चाणक्य नीतीत या पंक्तिवरुन बालपणाचं वर्णन केलं गेलं आहे.


पांच वर्ष लौं लालिये, दस सौं ताड़न देइ। सुतहीं सोलह बरस में, मित्र सरसि गनि लेइ।।


महाकाल लोकचे महंत प्रणव पुरींच्या म्हणण्याप्रमाणे, धर्मग्रंथातही वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बालकांना देव आणि देवीच्या रुपात पाहिलं जातं. त्यांच्या हसण्या-बागडण्याकडे पाहून मन प्रफुल्लित होतं. वयाच्या पाचव्या वर्षी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासंबंधीचे काकभूशुंडीचे श्लोक या प्रसंगासाठी अचूक वाटतात.


काकभूशुंडी काय म्हणाले?


तब तब अवधपुरी मैं जाऊं। बालचरित बिलोकि हरषाऊं॥
जन्म महोत्सव देखउं जाई। बरष पांच तहं रहउं लोभाई॥


या श्लोकाचा अर्थ असा आहे की, मी जेव्हा जेव्हा अयोध्येला जातो, त्यावेळी लहान मुलांना खेळताना पाहून मला आनंद होतो. मी तिथे जन्मोत्सव पाहायला जातो आणि त्यांना पाहण्यासाठी 5 वर्षं तिथेच राहतो.


रामललाची मूर्ती 51 इंचाचीच का?


पाच वर्षाच्या मुलाची उंची सुमारे 43 ते 45 इंच मानली जाते, परंतु ज्या काळात श्री राम जन्मले, त्या काळात सामान्य लोकांची सरासरी उंची जास्त होती. त्यानुसार 51 हा बरोबर अंक लक्षात घेऊन त्यांची उंची 51 मानली जात होती आणि तितक्याच उंचीची मूर्ती तयार करण्यात आली.


काळ्या दगडाची मूर्ती का बनवली?


शालिग्राम दगड पवित्र मानला जातो. हिंदू धर्मातील देवी-देवतांच्या मूर्ती या दगडापासून बनवल्या जातात.राम लालाची मूर्तीही शालिग्राम दगडापासून बनवली आहे. शालिग्राम हा काळ्या रंगाचा गुळगुळीत आणि अंडाकृती दगड आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, शालिग्राम हे भगवान विष्णूचे मूर्ती स्वरूप आहे. हा एक प्रकारचा जीवाश्म दगड आहे. पवित्र नदीच्या पात्रातून किंवा नदीकाठावरुन शालिग्राम दगड गोळा केला जातो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ram Mandir : देशातील सर्वात मोठी 10 राम मंदिरं माहितीये? 'या' राम मंदिरात भगवान कृष्ण करायचे रामलल्लाची पूजा