Mangala Gauri 2024 : आज श्रावण महिन्यातील दुसरी मंगळागौर आहे. श्रावण महिना हा अनेक व्रत-वैकल्यांनी भरलेला असतो. यात मंगळागौर (Mangala Gauri 2024) व्रत हे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. महिला मोठ्या उत्साहाने मंगळागौर साजरी करतात.


शंकराला मिळवण्यासाठी देवी पार्वतीने अनेक व्रतं केली होती, त्यातील महत्त्वाचं व्रत म्हणजे मंगळागौरी व्रत. हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, तर अविवाहित महिला चांगला नवरा मिळावा म्हणून करतात. यंदा मंगळागौरी कधी साजरी केली जाईल, तिथी आणि पूजा विधी जाणून घ्या.


दुसरी मंगळागौर तिथी


हिंदू पंचागानुसार, दुसरा श्रावणी सोमवार हा 12 ऑगस्टला झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 13 ऑगस्टला दुसरी मंगळागौर साजरी केली जाईल.


संपूर्ण मंगळागौर तिथी


पहिली मंगळागौर : 6 ऑगस्ट 2024 
दुसरी मंगळागौर : 13 ऑगस्ट 2024 
तिसरी मंगळागौर : 20 ऑगस्ट 2024 
चौथी मंगळागौर : 27 ऑगस्ट 2024 
पाचवी मंगळागौर : 3 सप्टेंबर 2024


मंगळागौर का साजरी करतात?


मंगळागौरला देवी पार्वतीची पूजा केली जाते. घरात सुख-समृद्धी यावी, चांगलं आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, नवविवाहित स्त्रियांनी मंगळागौरीचं व्रत केल्याने त्यांना सौभाग्य प्राप्त होतं. विवाहाच्या पहिली पाच वर्षे हे व्रत करावं लागतं.


मंगळागौरी व्रत (Mangala Gauri Vrat Puja Vidhi)


मंगळागौरी व्रताचे विशेष नियम आहेत. हा उपवास करणाऱ्या व्यक्तीला सूर्योदयापूर्वी उठावं लागतं. यानंतर प्रातविधी आटोपून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. यानंतर पाटावर गौरीचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करावी आणि शेजारी शिव लिंग ठेवावे, त्यासमोर कणकेचे दिवे लावून आरास सजवावी. त्यानंतर व्रताचा संकल्प घ्यावा. पूजा करताना सर्वात आधी विघ्नहर्ता गणपतीची पूजा करावी. यानंतर देवीची पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी.


पूजेत या गोष्टी करा अर्पण (Do this in Mangala Gauri worship)


मंगळागौरीला विविध पत्री आणि फुलं वाहावी आणि तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. त्यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचावी आणि नैवेद्य अर्पण करावा. मंगळागौरीची 16 दिव्यांनी आरती करावी. महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग 5 वर्षे मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shravan 2024 : तब्बल 71 वर्षांनंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून; 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ