Numerology Of Mulank 6 : ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात राशींना फार महत्त्व असतं. तसेच, अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), प्रत्येक मूलांकाला तितकंच महत्त्व असतं. अंकशास्त्रात, माणसाच्या जन्मतारखेवरुन मूलांक (Mulank) ठरवला जातो. अंकशास्त्रात 1 ते 9 मूलांकाचं वर्णन करण्यात आलं आहे. या मूलांकावरुनच व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या सवयी आणि व्यक्तीच्या भविष्याबाबत अंदाज वर्तवला जातो. या ठिकाणी आपण मूलांक 6 च्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असतो स्वभाव?
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6,15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह हा धनसंपत्ती, वैभव आणि भौतिक सुख शांतीचा कारक ग्रह मानला जातो. या मूलांकात जन्मलेल्या लोकांकडे पैशांची कमतरता नसते. या जन्मतारखेच्या लोकांना ऐशोआरामात जगायला आवडतं. तसेच, मोठमोठ्या कंपन्यांचे हे मालक असतात. मूलांक 6 ची आणखी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात.
स्मार्ट आणि आकर्षक व्यक्तिमत्व
या जन्मतारखेचे लोक राजेशाही थाटात जगणं पसंत करतात. त्याचबरोबर हे लोक वर्तमानात जगतात. पैशांच्या बाबतीत अजिबात कंजूष नसतात. तसेच, या जन्मतारखेचे लोक नेहमी स्वत:ला फीट आणि तरुण ठेवण्याचा प्रयत्न करतात. थोडासा मिश्कीलही स्वभाव असतो. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांची दूरदृष्टी असते. भविष्याबाबत हे लोक फार आग्रही असतात.
पैसा कमावण्यात तरबेज
अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक पैसा कमावण्यात फार तरबेज असतात. त्याचबरोबर यांचा ड्रेसिंग सेन्स फार चांगला असतो. यांच्या व्यक्तिमत्त्वात किंवा स्वभावात कोणताच असा वाईट गुण नसतो. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक मनानेही तितकेच श्रीमंत असतात. त्याचबरोबर, या लोकांची अनेकदा परदेशवारी असते. यांना जीवनातील सर्व सुख समृद्धीचा लाभ घेता येतो.
समाजात मिळतो मान-सन्मान
या जन्मतारखेच्या लोकांना समाजात मान-सन्मानही फार मिळतो. या लोकांना न्याय अतिशय प्रिय असतो. त्यामुळे न्यायाने दिलेली वागणूक यांना आवडते. यांचं ध्येय फार क्लिअर असतं. त्याचबरोबर या जन्मतारखेचे लोक व्यवसायात जोखीम घेऊन पैसा कमावतात. लीडरशीप क्वालिटी यांच्या फार असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाने हे लोक इतरांना प्रभावित करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :