Numerology Of Mulank 8 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 8 असलेल्या व्यक्ती या खूप वेगळ्या असतात.


मूलांक 8 हा शनीशी संबंधित आहे,  मूलांक 8 हा शनिचा अंक आहे. मूलांक 8 असलेल्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या मूलांकाचे लोक स्वभावाने चालाख असतात. परंतु कधी कधी यांची फसवणूक होते. हे लोक सर्वांसमोर पटकन व्यक्त होऊ शकत नाहीत, त्यांना स्टेज फियर असतं. परंतु, ते वैयक्तिकरित्या सर्वांशी चांगल्या गप्पा मारू शकतात. मूलांक 8 असलेल्या लोकांमध्ये आणखी कोणत्या खास गोष्टी असतात ते जाणून घेऊया.


हलक्या कानाचे असतात हे लोक


8, 17 किंवा 26 जन्मतारीख असलेले लोक हे हुशार तर असतात, पण कधी कधी त्यांची फसवणूक होते. हे लोक अतिशय हलक्या कानाचे असतात, ते कुणाच्याही बोलण्यात पटकन फसतात. ते समोरच्यावर लगेच विश्वास ठेवतात. कोण खरं, कोण खोटं याची जाणीव त्यांना नसते. कधी कधी खरं बोलणाऱ्याला ते खोटं समजतात आणि खोटं बोलणाऱ्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्यासारख्या ऐकतात.


लावालावी करण्यात असतात पुढे


मूलांक 8 चे लोक हे लावालावी करण्यात अग्रेसर असतात. याच्या गोष्टी त्याला आणि त्याच्या गोष्टी याला वाढवून-चढवून सांगण्यात त्यांना रस असतो. याच सोबत समोरच्याला आपल्या संवाद कौशल्यातून आकर्षित करण्याचा गुण त्यांच्यात असतो. समोरच्याकडून स्वत:चा फायदा कसा करुन घ्यायचा हे यांना बरोबर समजतं.


स्वाभिमान असतो यांना प्रिय


मूलांक 8 असलेल्या लोकांना त्यांचा स्वाभिमान फार प्रिय असतो. जे बोलतात ते करुन दाखवण्याची धमक त्यांच्यात असते आणि तसं करता आलं नाही तर त्यांना अजिबात चैन पडत नाही. ठरवलेली गोष्ट करुनच ते शांत होतात.


कठोर परिश्रम करुन यश मिळवतात


मूलांक 8 चे लोक आव्हानांना घाबरत नाहीत. कठोर परिश्रम करुन यश मिळवणं त्यांना आवडतं आणि यामुळेच शनिदेव या लोकांवर नेहमी प्रसन्न राहतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळही देतात. हे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरत नाहीत आणि त्यांचा धैर्याने सामना करतात. या लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो, पण हळूहळू ते यशाच्या पायऱ्या चढतात.


जबाबदारी घेण्यास घाबरत नाहीत


मूलांक 8 च्या लोकांमध्ये आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता असते. हे लोक इतरांना प्रेरणा देतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करतात. या मूलांकाचे लोक टीमवर्कवर विश्वास ठेवतात. कोणतीही जबाबदारी अगदी सहजपणे पेलतात. हे लोक दृढनिश्चयी आणि शिस्तप्रिय असतात. कोणतंही काम करताना स्वत:ला त्यात पूर्णपणे झोकून देतात. आपल्या वेळेचा पूरेपूर वापर करतात. तसेच, पैशांची गुंतवणूकही फार सांभाळून करतात. विनाकारण पैशांचा गैरवापर या मूलांकाचे लोक करत नाहीत. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : शब्दाचे एकदम पक्के असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे बोलतात ते करुन दाखवण्याची धमक, नुसत्या तोंडाच्या वाफा हा नाही यांचा स्वभाव