Navdurga 2024 : सध्याचे युग हे माहिती अन् तंत्रज्ञानाचे युग...त्यामुळे आजच्या युगात, कॉम्प्युटर आणि पर्यायानेच इंटरनेट सॅव्ही असणे, टेक्नोसॅव्ही असणे... ही अगदीच आवश्यक बाब! कधी काळी इंग्रजी भाषेला वाघिणीचं दूध म्हटले जात असे आणि ते दूध प्राशन करणारी, म्हणजेच पर्यायाने इंग्रजीचे उत्तम ज्ञान असणारी व्यक्ती म्हणजे सर्वशक्तीमान! अगदी तसेच, या युगातील वाघिणीचे दूध म्हणजे कॉम्प्युटरमधील सखोल, संपूर्ण ज्ञान!
तर या युगातील ह्या आधुनिक वाघिणीचे दूध केवळ प्राशनच न करता सरळ सरळ ह्या वाघिणीलाच वश करणारी...म्हणजेच आपल्या विदवत्तेच्या बळावर ह्या कॉम्प्युटरच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारी, आणि आजच्या तारखेला हजारो विद्यार्थ्यांना ते ज्ञान अर्पण करणारी... आजच्या दिवसाची सरस्वती रुपी दुर्गा आहे. डॉ. मीरा नार्वेकर!
मुंबईतील प्रसिद्ध आणि अग्रगण्य अशा...डी.जे.संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक प्रोफेसर आणि याच महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागाच्या प्रमुख असलेल्या प्राध्यापिका डॉ. मीरा नार्वेकर या मुंबई महाविद्यापीठातील सिनेटच्या माजी सदस्या आहेत. तसेच, त्या कॉम्प्युटर इंजिनीयरिंग्जच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या माननीय सदस्या देखील आहेत. एसएनडीटी विदयापीठातून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्राध्यापिका म्हणून तब्बल 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी जमा आहे.
ह्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे अनेक पुरस्कार आणि सन्मान आज त्यांच्या नावावर आहेत. 2021 साली मुंबई विद्यापीठातील अतिशय मानाच्या अशा समजल्या जाणाऱ्या आविष्कार ह्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या डॉ मीरा नार्वेकर ह्यांनी याच क्षेत्रातील उद्योन्मुख डॉक्टरांच्या अनेकविध प्रकारच्या प्रबंधांसाठी मार्गदर्शक.. म्हणजेच गाईड म्हणूनही आपले उल्लेखनीय असे योगदान दिलेले आहे.
IETE, IEEE, ISTE अशा अनेक प्रकारच्या व्यावसायिक समितींमध्येही त्यांनी एक सन्माननीय सदस्या ह्या नात्याने उचित मार्गदर्शन केलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील ह्या आधुनिक सरस्वतीने लिहीलेल्या दोन अभ्यासपर पुस्तकांचेही प्रकाशन आजवर झालेले असून त्यांचे आजवर अनेक जर्नल्स विविध महोत्सवात प्रकाशित झालेले आहेत. त्यांची कॉम्प्युटर इंजिनिअरिंग्सच्या क्षेत्रातील सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे ह्या क्षेत्रातील काही स्कॉलर्ससोबत काम करुन त्यांनी महत्त्वाचे पेटंटस ही संयुक्तरित्या मिळवलेले आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील या प्राविण्यामुळेच अनेक समितींमध्येही त्यांना मानाने निमंत्रित केले जाते. तसेच, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आवश्यक तेथे त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या विदवत्तेचा योग्य तो गौरवही केला जातो.
ह्या क्षेत्रातील त्यांची ही दैदीप्यमान वाटचाल, ही कुठल्याही स्त्रीसाठी एक अभिमानास्पद ठरावी.. अशीच आहे.
आणि म्हणूनच ...ह्या नवरात्राचे औचित्य साधून...आजच्या ह्या कॉम्प्युटर युगातील ह्या सरस्वती रुपी कर्तृत्ववान दुर्गेचा गौरव करण्यात आम्हाला एक वेगळ्याच आनंदाची अनुभूति मिळत आहे.
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :