Maghi Ganesh Jayanti : हिंदू (Hindu) धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणे माघ (Magh) महिन्यात दीड दिवसासाठी बाप्पा घरी विराजमान होतात. यंदा 13 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती येत आहे. या दरम्यान विविध गणेश मंडळांत, प्रचलित मंदिरांत माघी गणेश जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. मुंबईतही अशी अनेक प्रसिद्ध गणपती मंदिरं आहेत, जिथे पहाटेपासून माघी गणेश जयंतीचा उत्साह दिसून येतो. यंदाच्या गणेश जयंतीला (Ganesh Jayanti) तुम्ही मुंबईतील काही गणेश मंदिरांना भेट देऊ शकतात, या मंदिरांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सिद्धीविनायक मंदिर, दादर (Siddhivinayak Temple, Dadar)
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत लोकांची या मंदिरावर प्रचंड श्रद्धा आहे.गणेश जयंतीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पहाटे 5 वाजताच्या आरतीसाठी अनेक गणेश भक्त मंदिरात उपस्थित राहतात. मुंबईतील अनेक भागातील लोक पालखी घेऊन सिद्धिविनायक मंदिरात येतात. दादरच्या या मंदिरात माघी गणेश जयंती जल्लोषात साजरी केली जाते.
सिद्धीविनायक मंदिरात कसे पोहोचाल?
सिद्धीविनायक मंदिर दादरमधील प्रभादेवी भागात स्थित आहे. तुम्ही दादर रेल्वे स्थानकाबाहेरुन शेअर टॅक्सी करुन सिद्धीविनायक मंदिरात पोहोचू शकता. बरेच जण मंदिरापर्यंत पायी चालत जाणं पसंत करतात, हे मंदिर दादर स्थानकापासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.
बोरिवलीतील गणेश मंदिर (Vazira Naka Ganesh Temple, Borivali)
प्रभादेवीच्या सिद्धिविनायकानंतर बोरिवली पश्चिमेकडील वझिरा नाका येथील गणेश मंदिर देवस्थानाचं महत्त्व आहे. हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचं आहे. पूर्वी केवळ कोळी, भंडारी आणि स्थानिक ग्रामस्थच या मंदिरात दर्शनासाठी येत. आता मात्र या मंदिराचं महत्त्व वाढलं असून मुंबईतील अनेक भाविक गणेश दर्शनासाठी येथे येतात. या ठिकाणी पाच मंदिरं आहेत. गणेशाची मूर्ती उत्तर दिशेला असून बाजूला शितला देवीची मूर्ती आहे. त्याशिवाय मारुती आणि स्थानिक ग्रामदेवता आलजी देव यांचीही मंदिरं येथे आहेत.
बोरिवली वझिरा नाका मंदिरात कसे पोहोचाल?
बोरिवली स्थानकातून (पश्चिम) पायी किंवा रिक्षाने तुम्हाला वझिरा नाका येथे जाता येते, इथेच हे मंदिर स्थित आहे.
टिटवाळ्याचा महागणपती (Mahaganpati Temple, Titwala)
विवाह विनायक नावाने प्रसिद्ध असलेला हा महागणपती मुंबई जवळील टिटवाळा गावात आहे. या गणपतीचं दर्शन घेतल्यावर विवाह जुळतात, अशी मान्यता आहे. सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण-कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेले हे अतीप्राचीन मंदिर आहे. गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. चतुर्थी, मंगळवार या दिवसांशिवाय एरवी फारशी गर्दी नसल्यामुळे रांगेत ताटकळत उभे रहावे लागत नाही. मंदिराच्या सभामंडपात चांदीचा उंदीर आहे, या उंदराच्या कानात भक्त इच्छा सांगतात. शनिवार, रविवार आणि मंगळवारी तसेच संकष्टी चतुर्थीला मंदिरात उत्सव असतो. माघी गणेश जयंती देखील मंदिरात उत्साहात साजरी केली जाते.
टिटवाळा महागणपती मंदिरात कसे पोहोचाल?
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावर टिटवाळा रेल्वे स्टेशन आहे. टिटवाळा स्टेशनवर उतरल्यावर बाहेरच मंदिरात जाण्यासाठी शेअर रिक्षा मिळतात. पण आश्चर्य म्हणजे इथल्या रस्त्यावर अजूनही टांगे धावतात. टप.. टप.. आवाज करत धावणार्या टांग्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं.
गिरगावमधील फडकेवाडीतील गणपती (Phadke Wadi Ganpati Temple, Girgaon)
माघी गणेश जयंती गिरगावात देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. चर्नी रोड स्थानकावरून 20 मिनिटांच्या अंतरावर गिरगावमध्ये फडकेवाडीत हे गणेश मंदिर आहे. मूळच्या अलिबागमधील असलेल्या यशोदा गोविंद फडके यांनी 1890 मध्ये येथे गणेश मंदिर बांधलं. पतीच्या अकाली निधनामुळे निपुत्रिक राहिलेल्या यशोदाबाईंनी गणपतीला आपला पुतरे मानून येथे मंदिराची उभारणी केली. पुढे त्यांच्या स्नेही आणि नातलगांनी या मंदिराची सांभाळणी केली आहे.
फडकेवाडीतील गणपती मंदिरात कसे पोहोचाल?
पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकातून तुम्ही गणपती मंदिरात पोहोचू शकता. चर्नी रोड स्थानकाहून टॅक्सीने फडकेवाडीतील गणपती मंदिरात जाता येतं.
उद्यान गणेश मंदिर, दादर (Udyan Ganesh Mandir, Dadar)
मुंबईतील अनेक देवस्थानांपैकी एक म्हणजे दादर शिवाजी पार्कातील श्री उद्यान गणेश मंदिर. या मंदिरात माघी गणेश जयंतीला भाविकांची गर्दी होते. मंदिरातील गणेशची मूर्ती एका वडाच्या झाडाखाली प्रकट झाली, असं सांगितलं जातं. मूर्ती ज्या ठिकाणी प्रकट झाली, त्याच वडाच्या झाडाखाली या गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं. 1970 साली स्थापन झालेलं हे मंदिर 43 वर्ष जुनं असून मंदिराचा विस्तार हा 1972 साली करण्यात आला.
उद्यान गणेश मंदिरात कसे पोहोचाल?
उद्यान गणेश मंदिर मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही दादर स्थानकावरून पायी किंवा टॅक्सीने शिवाजी पार्कात जाऊ शकता.
हेही वाचा:
Maghi Ganesh Jayanti: माघी गणेश जयंती कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, पूजा पद्धत