Matrimony Frauds : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येकाला आयुष्यभर साथ देणारा आणि समजून घेणारा जोडीदार हवा असतो. हल्ली अनेक जण वधू-वर सूचक संकेतस्थळावर जोडीदार शोधण्यास अधिक पसंती देतात, पण आजकाल याच संकेतस्थळांवरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. मुंब्र्याच्या एका महिलेची बनावट वधू-वर सूचक संकेतस्थळावरुन एका व्यक्तीबरोबर ओळख झाली आणि नंतर त्या व्यक्तीकडून या महिलेची 13 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली.


बनावट संकेतस्थळावरुन तरुण-तरुणींची फसवणूक


विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळासारखं बनावट संकेतस्थळ बनवून तरुण-तरुणींना लुटण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे. बोगस कॉलसेंटरद्वारे विवाहाचं प्रलोभन दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोजपुरी निर्मात्यासह अन्य एका सूत्रधाराला मुंब्रा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक केली आहे. एजाज इम्तियाज अहमद उर्फ फहाद (32) रा. उत्तरप्रदेश असं आरोपीचं नाव असून तो या फसवणुकीतुन मिळालेला पैसा भोजपुरी चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरत असे. तर जैद फुल खान (24) रा.भोपाळ, मध्यप्रदेश असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे.


भामट्यांनी व्हिडीओ काॅल करून खोटं बोलून लुबाडलं


मुंब्रा पोलीस ठाण्यात सायबर सेल पथकाकडे जीवनसाथी डॉट कॉमवर हुबेहूब संकेतस्थळ बनवून फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने केली होती. या महिलेने या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. याचा फायदा उठवत जैद आणि एजाज या दोघांनी तिला विवाह करण्याचं आमीष दाखवलं. तसेच तिचा विश्वास बसावा म्हणून जैद याने तिला व्हिडीओ काॅल करून हिऱ्यांच्या दागिन्याचं आमीष दाखवलं. हे दागिने सीमा शुल्कच्या कचाट्यात अडकल्याचं भासवून तिच्याकडून 13 लाख 54 हजार 981 रुपये उकळले.


30 महिला-पुरुषांची फसवणूक, कोट्यवधींची फसवणूक


अखेर तक्रारीनंतर पोलिसांनी माग काढून 9 जानेवारीला जैद याला मध्यप्रदेशातील भोपाळमधून अटक केली. तर या प्रकरणातील मुख्य सुत्रधार एजाज हा उत्तरप्रदेशातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेशांतर करून पाठलाग करत त्यालाही जेरबंद केले. एजाज आणि जैद यांची ओळख त्यांच्या मैत्रिणीच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांनी बनावट कॉलसेंटर उभारून सायबर फसवणुकीचे जाळे विणले. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 30 महिलांची आणि काही पुरुषांची कोट्यवधींची फसवणूक केली. पोलिसांनी एजाज याचे कॉलसेंटर बंद करून ९ लॅपटॉप, जिओ कंपनीचे राउटर, मोबाईल, सिमकार्ड आणि इतर साहित्य हस्तगत केले. त्याला न्यायालयाने 22 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.


हेही वाचा:


Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं