Mahashivratri 2023 : माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री (Mahashivratri 2023) आहे. भगवान शिवाचा महत्वाचा सण महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा महाशिवरात्री अत्यंत दुर्मिळ योगायोग आणि शुभ मुहूर्तावर साजरी होणार आहे. या दिवशी शनि, चंद्र आणि सूर्य हे ग्रह कुंभ राशीमध्ये एकत्र येऊन त्रिग्रही योग तयार करत आहेत. ग्रहांची ही दुर्मिळ स्थिती विशेषतः अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीत या दिवशी शष योग आहे. दुसरीकडे, मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीत हंस योग आणि मालव्य योग असतील. मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी हे योग सामान्य फलदायी राहील. या वर्षी अत्यंत दुर्मिळ योगायोग घडला आहे, ज्यामध्ये राशीनुसार पूजा फलदायी ठरेल. जाणून घ्या


तुमच्या राशीनुसार करा भगवान शिवाची पूजा


अशा स्थितीत भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शंकराची पूजा करा आणि तुमच्या राशीनुसार मंत्रांचा जप करा, तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला कोणत्या द्रव्याने अभिषेक करायचा, कोणते फूल अर्पण करायचे आणि कोणत्या मंत्राचा जप करायचा ते शुभ राहील.



मेष
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो. भगवान भोलेनाथांना लाल चंदन आणि लाल रंगाची फुले अर्पण केल्यास खूप पुण्य प्राप्त होते. पूजेच्या वेळी ‘नागेश्वराय नमः’ मंत्राचा उच्चार केल्यास भगवान शिवशंकर मनातील इच्छा लवकर पूर्ण करतात.



वृषभ
वृषभ भगवान शिवाचे वाहन आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र मानला जातो. पांढरा रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. वृषभ राशीच्या लोकांनी चमेलीच्या फुलांनी शंकराची पूजा करावी. यासोबतच एखादे संकट दूर होण्यासाठी तसेच अपेक्षित लाभ मिळण्यासाठी शिव रुद्राष्टकांचे पठण करावे.



मिथुन
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन राशीचे लोक भगवान शंकराला बेलपत्र, भांग अर्पण करू शकतात. यासोबतच ‘ओम नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा जप करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.



कर्क
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, ज्याला भगवान शिव आपल्या डोक्यावर धारण करतात. कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. रुद्राष्टाध्यायचा पाठ तुमच्या संकटांचा नाश करणारा ठरू शकतो.



सिंह
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. भगवान शिवाच्या पूजेमध्ये सिंह राशीच्या लोकांनी लाल फूल अर्पण करावे. यासोबतच शिवालयात भगवान श्री शिव चालिसाचे पठण करावे. ही उपासना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.



कन्या
कन्या राशीचा स्वामी बुध मानला जातो. कन्या राशीच्या लोकांनी शिव पूजेत शिवलिंगावर बेलपत्र, धोतरा, भांग इत्यादी साहित्य अर्पण करावे. यासोबतच पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.



तूळ
शुक्र हा तूळ राशीचा स्वामी मानला जातो. शिवलिंगावर साखर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा. यासोबतच शिवाच्या सहस्रनामाचा जप करणे,  तुमच्या राशीनुसार शुभ आणि फलदायी मानले जाते.



वृश्चिक
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. भोले भंडारीची गुलाबपुष्प आणि बेलपत्राच्या मुळाने पूजा करावी. या दिवशी रुद्राष्टक पठण केल्याने तुमच्या राशीनुसार शुभ फळ मिळते.



धनु
गुरु हा धनु राशीचा स्वामी मानला जातो. त्यांना पिवळा रंग आवडतो. धनु राशीच्या लोकांनी शिवरात्रीला सकाळी लवकर उठून पिवळ्या रंगाच्या फुलांनी शंकराची पूजा करावी. खीर प्रसाद म्हणून द्यावी. तुमच्यासाठी शिवाष्टकाचे पठण केल्याने दुःखाचा नाश होतो.



मकर
मकर ही शनीची राशी मानली जाते. धोतरा, भांग, अष्टगंध इत्यादींनी भगवान शिवाची पूजा केल्याने तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी येईल. यासोबतच पार्वतीनाथाय नमः चा जप करावा.



कुंभ
कुंभ राशीचा स्वामीही शनी आहे. कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा. यासोबतच धनलाभ मिळण्यासाठी शिवाष्टकांचे पठण करावे. तुम्हाला लवकरच चांगले परिणाम मिळू शकतात.


 


मीन
मीन राशीचा स्वामी बृहस्पति आहे. मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृत, दही, दूध आणि पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करावे. घरामध्ये सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी पंचाक्षरी मंत्र 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा 108 वेळा चंदनाच्या माळेने जप करावा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला बनतोय 'महासंयोग'! या उपायांनी प्रसन्न होतील शिव, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..