Janmashtami 2024 Date : जन्माष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी (Janmashtami 2024) साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर त्याच्या मूर्तीची विधीवत पूजा करतात.


शास्त्रानुसार, या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती घरात आणून तिची पूजा करणं शुभ मानलं जातं. यामुळे बाळकृष्ण आनंदी होतो आणि प्रत्येक दुःख दूर करतो आणि सुख, समृद्धी, संपत्तीचा आशीर्वाद देतो. बाळकृष्णाच्या पूजेमुळे निपुत्रिकांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळतो. या वर्षी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्हीही बाळकृष्ण घरी आणणार असाल तर पूजा करण्याची योग्य पद्धत आणि काही नियम जाणून घ्या.


बाळकृष्ण पूजा पद्धत (Krishna Puja Niyam)


सर्वप्रथम घरी आणलेल्या बाळकृष्णाला स्वच्छ मोठ्या भांड्यात ठेवा. शुद्ध पाण्यात तुळस टाकून त्याला अंघोळ घाला. यानंतर बाळकृष्णाला नवीन कपडे घाला. जन्माष्टमीच्या दिवशी त्याला पिवळ्या, भगव्या किंवा लाल रंगाचे कपडे घालावे. मोरपंख लावलेला मुकूट कृष्णाच्या मूर्तीला परिधान करा. कानात झुमके आणि गळ्यात मोत्यांची माळ घाला. यासोबतच कमरपट्ट्यासह हातात बाजूबंद आणि पायात पैंजण घाला.


सुंदर असे कपडे आणि अलंकार परिधान केल्यानंतर बाळकृष्णाच्या कपाळावर पिवळं चंदन किंवा कुंकू तिलक लावा. तुम्हाला हवं असल्यास चंदनाचा टिका देखील तुम्ही लावू शकता. यानंतर कृष्णाला ताजी फुलं वाहा आणि हार अर्पण करा. यानंतर त्यांना झुल्यात बसवा आणि दूध, फळं, दही आणि साखरेचा प्रसाद दाखवा. यानंतर तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, शंख वाजवावा आणि श्री कृष्ण मंत्र, श्री कृष्ण चालीसा पठण करून शेवटी आरती करावी.


बाळकृष्णाची मूर्ती स्थापित केल्यानंतर हे नियम पाळा


दररोज बाळकृष्णाला अंघोळ घाला


जर तुम्हीही घरात बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करत असाल तर नित्यनियमाने त्याची पूजा करा. दररोज सकाळी बाळकृष्णाला अंघोळ घाला. 


मनोभावे पूजा करा


बाळकृष्णाला देवघरात ठेवल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने मनोभावे पूजा करणं महत्त्वाचं आहे. बाळकृष्णाला नियमित सकाळ-संध्याकाळ सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवा.


श्रृंगार करा


बाळकृष्णाला दररोज अंघोळ घालून त्यांचे वस्त्र बदलावे. बाळकृष्णाला श्रृंगार खूप आवडतो. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्यावे. बाळकृष्णाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा.


बाळकृष्णाला घरी एकटं सोडू नका


घरात बाळकृष्णाच्या मूर्तीला एकटं सोडून बाहेर जाऊ नये. घरात नेहमी कोणीतरी असणं आवश्यक आहे.


पलंगावर झोपवा


रात्री बाळकृष्णाला देवघरात पलंगावर झोपवावं. संध्याकाळी आणि सकाळी कृष्णाची आरती करावी.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Janmashtami 2024 Date : श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व