Bhishmashtami 2024 : दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी (Ashtami) ही भीष्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात भीष्माष्टमीला विशेष महत्त्व आहे. भीष्म अष्टमी किंवा 'भीष्माष्टमी' हा दिवस महाभारतातील 'भीष्म' यांना समर्पित आहे. भीष्म, ज्यांना ‘भीष्म पितामह’ म्हणूनही ओळखलं जातं, त्यांनी या दिवशी आपले प्राण त्यागले होते.


भीष्माष्टमी 2024 मध्ये कधी? (Bhishmashtami 2024 Date)


यंदा 2024 मध्ये शुक्रवारी, म्हणजेच 16 फेब्रुवारीला भीष्माष्टमी आहे. भीष्म पितामह यांनी या दिवशी आपला देह सोडला होता, म्हणून हा दिवस त्यांचा निर्वाण दिन आहे. भीष्माष्टमी उत्तरायणादरम्यान (Uttaryan) होते, हा वर्षाचा सर्वात पवित्र काळ असतो, जेव्हा सूर्य उत्तर दिशेला असतो. पौराणिक कथांनुसार, भीष्मांना उत्तरायणादरम्यान आपला मृत्यू हवा होता, म्हणून त्यांनी महाभारताच्या रणांगणात पराभवानंतर अंगावर लागलेल्या बाणांमध्ये राहणं पसंत केलं आणि उत्तरायणानंतर आपले बलिदान दिले.


भीष्माष्टमी मुहूर्त (Bhishmashtami Muhurta)


हिंदू दिनदर्शिकेनुसार, शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी भीष्माष्टमी साजरी होईल. अष्टमी तिथी 16 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी सुरू होईल आणि 17 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी समाप्त होईल.


भीष्माष्टमीची पौराणिक कथा (Bhishmashtami Story)


माघ शुक्ल पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी भीष्मांचं निधन झालं, अशी पौराणिक मान्यता आहे. महाभारताच्या महायुद्धात जेव्हा ते जखमी झाले तेव्हा त्यांनी शरीर सोडले नाही, परमात्म्याला भेटण्यासाठी त्यांनी उत्तरायणाची वाट पाहिली. महाभारतात ज्या दिवशी पार्थ भीष्मांवर बाणांचा वर्षाव करतात, त्यावेळी सूर्य दक्षिणायन असतो. इच्छा मरणाचं वरदान प्राप्त असल्यामुळे भीष्म आपले प्राण सोडत नाही. जेव्हा सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, तेव्हा माघ शुद्ध अष्टमीच्या दिवशी भीष्माचार्य आपले प्राण सोडतात आणि म्हणूनच माघ शुद्ध अष्टमीला भीष्माष्टमी असंही म्हटलं जातं.


माघ महिन्यातील अष्टमीच्या वेळी सूर्याची उत्तर दिशेकडील वाटचाल सुरू होते, ज्याला ‘उत्तरायण’ कालावधी म्हणतात. याच उत्तरायणाच्या शुभ वेळी पितामह भीष्मांचं निधन झालं. परमात्म्याला भेटण्यासाठी भीष्मांनी माघ शुक्ल अष्टमीच्या शुभ दिवसाची वाट पाहिली. 


भीष्माष्टमी व्रताचं महत्त्व (Bhishmashtami Vrat Significance)


भीष्माष्टमी तिथीचं व्रत केल्याने संतानप्राप्तीचा आनंद मिळतो, अशी पौराणिक मान्यता आहे. या दिवशी विशेषत: महिला उपवास करतात, यामुळे संतती सुखाचा आनंद मिळतो. त्यासोबतच संततीच्या जीवनात आनंद नांदतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Ratha Saptami 2024 : रथ सप्तमीला बनतोय विशेष योग; सूर्यदेवाची 'या' राशींवर राहणार कृपा, उघडणार उज्वल भविष्याचे द्वार