Bhagavad Gita In School : इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीता, (Bhagavad Gita), मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याबाबतच्या चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहेत.  एससीईआरटीने (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) सूचवलेल्या अभ्यासक्रमावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.  मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करुन देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणं हा त्यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने  राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. 


स्वभाववृत्ती आणि मुल्ये या घटकांची ओळख करुन देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा विचार देखील एससीईआरटी करत असल्याची चर्चा आहे, हा निर्णय पुढे वादग्रस्त देखील ठरू शकतो.  


तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम कसा असणार?


भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा, असं SCERT ने सुचवलं आहे. तिसरी ते पाचवीपर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


भारतीय संस्कृतीच्या इतर बाबीही शिकवल्या जाणार


त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, त्यांचा आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचं आराखड्यात नमूद करण्यात आलं आहे.


राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य


मराठी माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमांमध्येही मराठी भाषा शिकवणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, अभ्यासक्रम आराखड्यात अद्यापही त्याबाबत स्पष्ट तरतूद नाही. मराठी व्यतिरिक्त इतर भाषा माध्यमांच्या शाळांमधील भाषा निवडीचे पर्याय कसे असावेत, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.


महाराष्ट्र राज्यात इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, पंजाबी, सिंधी, तामिळ माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये स्थानिक भाषा मराठी असल्याने तीच प्राथमिक भाषा करायला हवी होती. परंतु, या बाबतीत अद्यापही कोणत्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाही.


हेही वाचा:


Shani Dev : 135 दिवस शनि चालणार उलटी चाल; वृषभसह 'या' 4 राशींवर धनवर्षाव; अडकलेली कामंही मार्गी लागणार