Astrology On Relationships : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology), ग्रह आणि नक्षत्रदेखील नातेसंबंध (Relationship) आणि प्रेमाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुमच्या कुंडलीतील ग्रह शुभ असतील तर प्रेमात यश मिळतं. तसेच, वैवाहिक जीवन देखील आनंदी राहतं. पण, कुंडलीत ग्रहांची स्थिती जर खराब असेल तर प्रेमात व्यक्तीची वारंवार फसवणूक होते. यामुळेच कुंडलीतील कोणत्या ग्रहाच्या वाईट प्रभावामुळे प्रेमात फसवणूक होते ते जाणून घेऊयात.
'या' ग्रहांमुळे प्रेमात फसवणूक होते
ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत पंचमेश आणि सप्तमेश हे ग्रह नातेसंबंध दर्शवतात. जेव्हा या भावांवर शुभ ग्रहांचा प्रभाव पडतो तेव्हा व्यक्तीचे प्रेमसंबंध दृढ होतात आणि त्यांना खरं प्रेम मिळतं. या शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळते. तसेच, जोडीदाराच्या भाग्यातही वाढ होते. जेव्हा कुंडलीच्या या भावावर अशुभ ग्रह ग्रहाचा प्रभाव असतो. तेव्हा प्रेम संबंधांमध्ये काहीना काही अडथळे निर्माण होतात. यामुळेच नात्याला यश मिळत नाही.
जर पंचमेश आणि सप्तमेश ग्रह तुमच्या कुंडलीत कमजोर असतील तर व्यक्तीला प्रेमसंबंधांमध्ये अपयशाचा सामना करावा लागतो. अशा वेळी नात्यात वारंवार फसवणूक होते. दोघांत वाद सुरु होतात. आणि याचं अंतिम फलित म्हणजे नात्यात अंतर वाढतं आणि नातं तुटतं. म्हणजेच ब्रेकअप होतो.
राहू, मंगळ, सूर्य की शनी?
ज्योतिष शास्त्रानुसार राहू, मंगळ, सूर्य आणि शनी यांपैकी कोणतेही ग्रह उच्च राशीत असतील तर त्यांची दृष्टी उच्च राशीतून पाचव्या भावात आणि सातव्या भावावर पडते. प्रेमसंबंधांसाठी किंवा वैवाहिक जीवनासाठी ही स्थिती चांगली नसते. कुंडलीत राहू, केतू आणि चंद्राचा संयोग असला तरी प्रेमसंबंधांमध्ये काहीतरी अडचणी निर्माण होतात. चंद्रामुळे मनातील विचार बदलू लागतात आणि प्रत्येक विषयावर वाद होऊ लागतात. अशा परिस्थितीत ब्रेकअप लवकर होते. असं ज्योतिष शास्त्रात म्हटलंय.
राहूची महादशा नातेसंबंधांसाठी घातक
राहूची महादशा नातेसंबंधांसाठी धोकादायक मानली जाते. यामुळे, व्यक्तीमध्ये संयमाचा अभाव असतो आणि नात्यात अडकून राहण्याची भीती असते. राहू ग्रहाच्या महादशा दरम्यान, व्यक्तीला नातेसंबंध तयार करण्यात आणि टिकवून ठेवण्यात खूप अडचणी येतात. अशा वेळी त्यांचे प्रेमसंबंध स्थिर राहत नाहीत.
राहूच्या महादशामध्ये घटस्फोटाची शक्यताही वाढते. राहू वैवाहिक जीवनात अनियमितता, अस्थिरता आणि विश्वासघात निर्माण करतो. महादशा दरम्यान वैवाहिक संबंधांमध्ये तणाव वाढतो आणि व्यक्तीला परस्पर संवादात अनेक अडचणी येतात. अशा परिस्थितीत या ग्रहांना शांत करण्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे असं ज्योतिषशास्त्रात म्हटलंय.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: