Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत... आज आषाढी एकादशी. आज संपूर्ण महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. आषाढी म्हटलं की आठवतं पंढरपूर, तिथली वारी आणि भक्तिरसात रमलेले वारकरी. आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) पंढरपुरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते, अनेकजण विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठतात. अनेकजण पायी वारी करतात. 


दरवर्षी प्रत्येकालाच पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेणं जमत नाही. कायम वारी करणाऱ्यांची वारीही काही वेळा काही कारणांवरुन चुकते, अशा वेळी अनेकजण जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतात. त्याच प्रमाणे माऊलींची कृपा तुमच्यावर सदैव राहावी, यासाठी तुम्ही घरच्या घरी देखील विठ्ठलाची पूजा करू शकता. ही विधीवत पूजा नेमकी करायची कशी? जाणून घेऊया.


आषाढी एकादशी तिथी (Ashadhi Ekadashi 2024 Date)


आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असते. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आली आहे, या दिवसापासून चातुर्मासही सुरू होणार आहे.


आषाढ शुक्ल एकादशी तिथी 16 जुलै 2024 रोजी रात्री 8 वाजून 33 मिनिटांनी सुरू झाली आहे आणि 17 जुलै 2024 रोजी रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, आषाढी एकादशीचं व्रत 17 जुलै रोजी पाळलं जाणार आहे.


आषाढी एकादशी शुभ योग (Ashadhi Ekadashi 2024 Shubh Yog)


आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 7 वाजून 05 मिनिटांपर्यंत शुभ योग तयार होत आहे. यानंतर शुक्ल योग असेल आणि 18 जुलै रोजी सकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी हा योग समाप्त होईल. आषाढी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योगही जुळून येत आहे.


आषाढी एकादशी पूजा पद्धत (Ashadhi Ekadashi Vitthal Puja Vidhi)


आषाढी एकादशीला तुम्ही घरच्या घरी विठ्ठलाची पूजा करू शकता. आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास असतो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि घरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. स्वच्छ कपड्याने विठुरायाची मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा. विठुरायाला स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. यानंतर देवाला उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा.
विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आधल्या दिवशी तुळस तोडून ती विठुरायाला अर्पण करावी, असं केल्याने शुभ फल प्राप्त होतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ashadhi Ekadashi 2024 : आज आषाढी एकादशीला जुळून आले अनेक शुभ योग; 'या' राशींवर राहणार पांडुरंगाची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत