Adhik Maas 2026: अधिक मास... ज्याला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते...हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानले जाते. यंदा 17 मे ते 15 जून 2026 या काळात 'अधिक ज्येष्ठ मास( Adhik Maas 2026) म्हणजेच पुरुषोत्तम मास साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अधिक मासात भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि कुलदैवतांची विशेष पूजा केली जाते. या काळात जप, तप, दान, व्रत, पारायण, भागवत कथा, गीता वाचन आणि तीर्थस्नान यांना विशेष महत्त्व असते. या महिन्यात केलेले दान आणि धार्मिक कार्य इतर महिन्यांपेक्षा अधिक पुण्यदायी मानले जाते. अधिक मासात जावयाला वाण देण्याची प्रथा आहेत, सोबत कुलदेवतेची ओटी आणि मुलगी तिच्या आईची ओटी देखील भरते, मात्र या मासात मुलगी आपल्या सासूची ओटी का भरू शकत नाही? काय आहे या पवित्र विधीमागील शास्त्रीय कारण, त्याचे महत्त्व आणि यंदाच्या अधिक मासातील नियम जाणून घ्या...

Continues below advertisement

अधिक मासात विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते, पण सासूची का नाही? (Adhik Maas 2026)

अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, अधिक मासात मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते, पण सासूची का नाही? शास्त्रानुसार, विवाहित मुलगी तिच्या आईची ओटी भरते, कारण आई हे साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. अधिक मासात मातृशक्तीचा सन्मान केल्याने सर्व ग्रहांचे दोष दूर होतात, अशी मान्यता आहे. या शुभ महिन्यात आईचा सन्मान करून तिची ओटी भरल्यास घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते, अशी धार्मिक धारणा आहे. मात्र याच अधिक मासात सासूची ओटी का भरली जात नाही? या परंपरेमागे शास्त्र आणि भावना दडली आहे, अनेक ठिकाणी अधिक मासात आई (माहेरची आई), मुलगी, जावई किंवा सुवासिनी यांना वाण देणे आणि ओटी भरणे ही प्रथा अधिक प्रचलित आहे. मात्र काही कुटुंबांमध्ये सासूची ओटी भरली जात नाही..

Continues below advertisement

'ओटी' भरणे म्हणजे नेमके काय? 

धार्मिक मान्यतेनुसार ओटी याची खरा अर्थ म्हणजे नाभीच्या खालचे पोट, जिथे स्त्रीचे गर्भाशय असते.स्त्रीच्या गर्भाशयात वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. विवाहित स्त्रीचे मातृत्व फुलावे, फळावे आणि तिला उत्तम संततीप्राप्त व्हावी, याच आशीर्वादाचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे 'ओटी भरणे' होय. यासाठी तांदूळ, श्रीफळ, हळकुंड, खण आणि पाच प्रकारची फळे यांसारख्या सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू वापरल्या जातात. 

सासूची ओटी का भरली जात नाही?

हिंदू संस्कृतीत 'ओटी भरणे' हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा आणि अखंड सौभाग्याचा गौरव करणारा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. अधिक मासात सासूची ओटी भरली जात नाही, कारण अनेकांच्या कुलपरंपरेत अधिक मासातील वाण किंवा ओटीचा मान विशिष्ट नात्यांपुरताच मर्यादित ठेवला जातो. धार्मिक आणि कौटुंबिक नियमांनुसार पाहायला गेलं तर, मुलगी लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा सासरी येते, तेव्हा सासू आपल्या सुनेची ओटी भरून स्वतःचा मुलगा राजीखुशीने तिच्या पदरात टाकते. नियम काय सांगतो? सासू ही नेहमी सुनेला आशीर्वाद देणाऱ्या स्थानी असते. सासूकडून मिळालेली ती 'आशीर्वादरूपी ओटी' सुनेला सासूला परत करता येत नाही. सासू ही आधीच त्या घराची लक्ष्मी आणि पूर्णान्न असते, त्यामुळे सुनेने सासूची ओटी भरणे शास्त्राला धरून मानले जात नाही.

विधवा मातांची ओटी भरतात का?

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. कारण पतीशिवाय गर्भधारणा शक्य नसते आणि हा विधी नवनिर्मितीशी जोडलेला आहे. जर एखाद्या मुलीची आई विधवा असेल, तर तिची खणा-नारळाने ओटी न भरता, तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचे आशीर्वाद घ्यावेत. पर्यायी उपाय जाणून घ्यायचा असल्याची आईची ओटी भरणे शक्य नसल्यास, घरातील किंवा परिचयातील इतर कोणत्याही सुवासिनीची (सवाष्ण स्त्रीची) ओटी भरावी. यामुळेही सौभाग्याचे उत्तम आशीर्वाद लाभतात. 

हेही वाचा

Adhik Maas: अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)