Yavatmal Rain News : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर कुठं पूरस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. सततचा पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार हेक्टरवरील शेतजमीन आणि पिके बाधित झाली आहेत. 


दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजारांचे तातडीने अनुदान देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी पीक नुकसान मदत दुप्पट मणजेच 10 हजार देण्याची घोषणा अधिवेशनात जाहिर केली आहे. प्राथमिक अंदाजनुसार यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार हेक्टरवरील शेतजमीन आणि पिके पुरामुळे बाधित झाली आहेत. यात शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लाखात असून मिळणारी मदत ही हजारात आहे. मात्र, ही मदत कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


राज्याच्या काही भागात मुसळधार पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आल्यानं जिल्ह्यातील नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. या पावसात कुणाचे घर पडले तर कुणाचे शेतच खरवडून गेलं आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 


पालकमंत्र्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन घेतला आढावा


मागील तीन ते चार दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे  यवतमाळ, नेर, दारव्हा तालुक्यातील घुई, कामनदेव, रामगाव रामेश्वर इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नुकसानग्रस्त भागात  शेतीच्या बांधावर जाऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. यावेळी अतिवृष्टीग्रस्त भागात युद्धपातळीवर पंचनामे करुन नागरिकांना मदत उपलब्ध करुन देण्यात यावी. पाच हजार रुपयांची सानुग्रह अनुदान मदत वितरीत करावी, रेशनच्या माध्यमातून अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात यावे. अतिवृष्टी भागात रोगराई पसरणार नाही याची दक्षता घेऊन औषध फवारणी करण्यात यावी. तसेच रुग्णालयांमध्ये मुबलक प्रमाणात औषधांचा साठा ठेवावा असे निर्देश राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Rain News : पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क