UP Election 2022 : उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीतली सर्वात घमासान लढाई कुठल्या प्रदेशात रंगली असेल तर ती पश्चिम उत्तर प्रदेशात. देशातलं सर्वाधिक ऊस उत्पादन होणारा हा साखरपट्टा. शिवाय जाटलँड अशीही त्याची ओळख. उत्तर प्रदेशची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जर कुठली समान गोष्ट असेल तर ती म्हणजे साखरेचं राजकारण. पश्चिम महाराष्ट्र हा आपला शुगर बेल्ट तसा वेस्टर्न यूपी हा इथला शुगर बेल्ट.
दिल्लीची वेस ओलांडून बागपतच्या दिशेनं निघालात की जिकडे बघावं तिकडे उस दिसू लागतो. ऊसाचं पीक म्हणजे कमी श्रमात किमान पैशांची हमी. त्याचमुळे उत्तर प्रदेशच्या इतर भागांपेक्षा हा तसा आर्थिक सुबत्तेचा प्रदेश. ऊसासाठी सर्वात आवश्यक गोष्ट भरपूर पाणी. पश्चिम यूपी हा गंगा आणि यमुनेच्यामध्ये वसलेला प्रदेश. इथली जवळपास 40 लाख कुटुंबं केवळ ऊसाच्या शेतीवर अवलंबून आहेत.
उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांकडे ऊसाच्या जातीबाबत फारसा चॉईस नाही. क्षेत्र जास्त असलं तरी इथल्या ऊसाची रिकव्हरी महाराष्ट्रापेक्षा खूप कमी असायची.पाच सहा वर्षांपूर्वी को 238 ही जात विकसित झाल्यानंतर हा प्रश्न काहीसा मिटला..पण सतत तेच पीक घेऊन आता पुन्हा उत्पादकतेवर परिणाम होऊ लागलाय.
महाराष्ट्रातली ऊस शेती ही काळ्या मातीतली. तर उत्तर प्रदेशातली जमीन अधिकांश गाळाची माती..पोटॅश, फॉस्परेकि अॅसिडची योग्य मात्रा असलेली ही जमीन ऊसाच्या लागवडीसाठी योग्यही..पण हवामानामुळेही ऊसाच्या शुगर कंटेटमध्ये बराच फरक पडतो.
काय फरक, काय साम्य?
को 86032, को एम 0265 या उसाच्या जाती आपल्याकडे लोकप्रिय आहेत
तर उत्तर प्रदेशात को 0238 या ऊसाची लागवड अधिक प्रमाणात होते
आपल्याकडे ऊसाची उत्पादकता 85 टन प्रति हेक्टरपर्यंत आहे
उत्तर प्रदेशात मात्र हे उत्पादन हेक्टरी 80 टनच्याच आसपास
महाराष्ट्रात ऊसाचा रिकव्हरी रेट 10.50 ते 11.20 च्या आसपास आहे
तर उत्तर प्रदेशात ही रिकव्हरी 10.76 ते 11.46 च्या आसपास
महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची संख्या 190 च्या आसपास आहे
उत्तर प्रदेशात ही संख्या आहे जवळपास 120
ऊसाच्या राजकारणानं देशाचं तख्तही अनेकदा हलवलं
वेस्टर्न यूपीतल्या ऊसाच्या राजकारणानं देशाचं तख्तही अनेकदा हलवलं आहे. महेंद्रसिंह टिकैत हे शेतकरी नेते याच पट्ट्यातले. तर देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचं हापूर हे देखील याच भागात येतं. याच दोन नेत्यांची पुढची पिढी म्हणजे राकेश टिकैत आणि जयंत चौधरी. या निवडणुकीत जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल हा पक्ष अखिलेश यांच्यासोबत लढतोय. तर दुसरीकडे टिकैत प्रत्यक्ष मैदानात उतरले नसले तरी शेतकरीविरोधी भाजपला मतपेटीतून शिक्षा द्या असं आवाहन त्यांनी केलंय.
एकूण 75 जिल्ह्यांपैकी 27 जिल्हे उस उत्पादक. 403 पैकी 115 आमदार या ऊस पट्ट्यातून निवडून येतात. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात पंजाब हरियाणा पाठोपाठ उत्तर प्रदेशचा जो शेतकरी सहभागी होता तो याच पट्ट्यातला.
ऊस शेतकरी कुणाच्या बाजूनं उभा राहतो यावर बरंच काही अवलंबून
सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार 2012 मध्ये केवळ 7 टक्के जाटांनी भाजपला मतदान केलं 2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीनंतर हे प्रमाण 2014 मध्ये 77 टक्क्यांवर पोहचलं..तर 2017 मध्ये तब्बल 91 टक्के जाटांनी भाजपला मतदान केलं होतं...2012 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या भाजपला पश्चिम उत्तर प्रदेशात 70 पैकी केवळ 11 जागा मिळाल्या होत्या, त्या 2017 मध्ये 70 पैकी 51 इतक्या संख्येवर पोहचल्या..त्याचमुळे आता यावेळी हा ऊस शेतकरी कुणाच्या बाजूनं उभा राहतो यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.