Rain in Maharashtra :  एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. या पावसामुळं कांदा , गहू उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातही रात्री वादळी वाऱ्यासह  झालेल्या पावसामुळं आंबा शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. तसेच कोकणातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
 
दरम्यान, हवामान विभागाने (India Meteorological Department) पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह  पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आणकी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव , संग्रामपूर , जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे कांदा आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. बुलढाणा जिल्ह्यात कालपासूनच ढगाळ वातावरण होते. तापमानात देखील घट झाली होती. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं आंबा शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. वाशिमचे प्रगतशील शेतकरी सुनील लोनसुने यांच्या शेतातील आंबा बागेला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सुनिल लोनसुने यांचं मोठं नुकसान झालं आहे.




कोकणात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाच्या तूरळक सरी बरसल्या. लांजा तालुक्यातील भांबेड भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या भागात गारा देखील पडल्या. सध्या कोकणातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आंबा आणि काजूचे मोठे नुकसान होत आहे. तर जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी तापमानात वाढ झाल्याने उकाडाही जाणवत आहे.




राज्यातील काही भागात कालपासूनच ढगाळ आकाश आहे. तर काही भागात हलका पाऊसही सुरु आहे. वाढत्या उष्णतेमुळं अंगाची लाही लाही होत असताना राज्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मराठवाड्यासह तळकोकणाला या वादळी वाऱ्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.