Untimely rain : सध्या राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत असल्याचे वातावरण आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे हरभरा, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच द्राक्ष उत्पादकांना देखील या अवकाळी पवसाचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोपखेल आणि  चरणमाळ घाटात प्रचंड गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.


कांदा, गहू, हरभरा पिकांचं नुकसान


नवापूर तालुक्यातील बोरझर, चरणमाळ, प्रतापपूर तसेच धुळे जिल्ह्यातील बोपखेल, वारसा, उमरपाटा, कुडाशी, मांजरी, शेंडवाद ,नांदरखी या पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रात्री एक ते दीड तास अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. गारपीट एवढी झाली की बोपखेल गाव आहे की जम्मू कश्मीर असे वाटू लागले आहे. कारण, संपूर्ण गावात बर्फाची पांढरी चादर पसरलल्याचे पाहायला मिळाले. 




एकीकडे उन्हाचा कडाका असताना दुसरीकडे नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली आहे. नवापूर  व साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. चार वाजण्याच्या सुमारास धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात बोपखेल या भागात प्रचंड गारपीट झाल्यानं काही पक्षी देखील मृत्युमुखी पडले आहेत. काही कोंबड्या दगावल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील काही गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. तसेच गुजरात राज्यातील सोनगड तालुक्यातील ओटा परिसरात देखील गारपीट झाल्याने पिकांचं नुकसान झालं आहे. ऐन उन्हाळ्यात गारपीट झाल्यानं वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.


याचबरोबर तळकोकणात देखील चांगलाच पाऊस झाला आहे. तसेच त्या ठिकाणी गारपीटही झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, कणकवली फोंडा परीसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. जवळपास अर्धातास गडगडाटासह पाऊस कोसळला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाला फटका बसला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: