सांगली: राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) बळीराजावर उपासमारीची वेळ आलीय. सांगली (Sangli News) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकटांचा डोंगर उभा ठाकलाय. अवकाळी पावसामुळे आता द्राक्षाच्या घडात कुज होऊ लागली आहे . त्यामुळे हे घड द्राक्षे मजुरांच्या कडून काढून ओढ्यात टाकण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांच्या वर आली आहे. तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील शेतकरी महेश पाटील या शेतकऱ्याच्या द्राक्ष (Grapes) बागेला अवकाळीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष बागेतील द्राक्ष काढून ओढ्यात टाकावी लागत आहेत. त्यामुळे आता जगायचं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील शेतकरी महेश पाटील या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेला अवकाळीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष बागेतील द्राक्षे काढून ओढ्यात टाकावी लागत आहेत. तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात 29 आणि 30 नोव्हेंबर मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन भरीव आर्थिक मदत करावी व द्राक्ष उत्पादकासाठी कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत आहे. द्राक्ष घड फेकून देण्याची वेळ आल्याने यंदा द्राक्षाच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.
शेतकऱ्यांनी कापणी केलेलं पीक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला
मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचे पंचनामे पूर्ण होत नाही तर आता मिचौंग चक्रीवादळाचं संकट घोंघावतंय. पूर्व विदर्भात आज आणि उद्या वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. त्य़ामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी कापणी केलेलं पीक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला नागपूर वेधशाळेने शेतकऱ्यांना दिला आहे.
खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करा, के सी पाडवी यांची मागणी
गेल्या आठवडाभरात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केलाय. या अवकाळीमुळे शेती आणि पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चारा पावसामुळे खराब झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावर जगवावीत कशी? असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के सी पाडवी यांनी केलीय. सरकार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत आहे मात्र पशुपालक शेतकऱ्यांचा विचार कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे. पिकांप्रमाणेच खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे प्रशासनातील अधिकाऱ्यांना या विषयातील गांभीर्य नसल्याचे ही दिसून येत आहे. पशुपालक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. शासकीय स्तरावरून चारा खराब झालेल्या शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी मदत करावी त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के सी पाडवी यांनी केले आहे