Parshottam Rupala : कृषी संशोधनासाठी आयसीएआरच्या (Indian Council of Agricultural Research) धर्तीवर इंडियन कौन्सिल ऑफ व्हेटरनरी रिसर्च होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभाग त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभाग, दुग्ध संवर्धन विभाग हे स्वतंत्र विभाग म्हणून कार्यरत झाले आहेत. यामुळं पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसायातील  तंत्रज्ञान, पायाभूत सुविधाचा विकास यावर विशेष भर देण्यात आला असल्याचे  पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितलं. 




नागपूरच्या महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा माफ्सूच्या अधीन सेमीनरी हिल्स येथील  पशुवैद्यकीय महाविद्यालयात 20 वा दीक्षांत सोहळा पार पाडला. तसेच नॅशनल अॅकॅडमी ऑफ वेटरनरी सायन्सेस एनएवीएसच्या दोन दिवसीय वैज्ञानिक परिषदचे आयोजन  करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम  रुपाला यांचे हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ .मोहन भागवत उपस्थित होते. 
प्राकृतिक शेतीसाठी, मातीतील कार्बन फिक्सेशनसाठी गायीचे  शेण महत्वाचे आहे. गोधनाच्या नैसर्गिक मृत्युनंतर त्यांच्या देहाच्या विल्हेवाटीचे प्रमाणिकरण , त्यापासून नैसर्गिक खतनिर्मिती अशा प्रक्रियावरही या परिषदेत चर्चा  व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी रुपाला यांनी व्यक्त केली. 




भारत देशात परंपरागत कृषी विद्या प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. पाश्चात्य देशातील कृषी विज्ञान शिरकाव करण्याअगोदर आपली शेती आणि पशु शाळा या प्रयोग शाळा तर आपले शेतकरी हे वैज्ञानिक होते. त्यांचे हे  कालसुसंगत ज्ञान परीक्षण न  करताच,  त्या ज्ञानाला अवैज्ञानिक म्हणणे चुकीचे आहे. कृषी संशोधनाला भारत केंद्रित बनवून स्थानिक आवश्यकतेनुसार पूर्तता  करणे यावर भर असावा. पशुवैद्यकीय विज्ञान शेतकऱ्यांपर्यंत सहजरित्या पोहोचण्यासाठी  नवीन राष्ट्रीय शिक्षण  नीती प्रमाणे स्थानिक भाषेत सुद्धा उपलब्ध व्हावं असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ . मोहन भागवत यांनी केलं. यावेळी माफ्सूचे कुलगुरू डॉ. प्रवीण पातुरकर यांनी विद्यापीठाव्दारे करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कळमेश्वरच्या दुधबर्डी येथील कृषी विज्ञान केंद्राची स्थापना, आयसीएमआर पुरस्कृत 'वन हेल्थ सेंटर' ला मंजूरी, कोवीड चाचणी प्रयोगशाळेतून 25 हजार नमुन्यांची तपासणी या उपक्रमांचा त्यांनी  यावेळी ल्लेख केला.