Swabhimani Shetkari Sanghatana : गेल्या सहा दिवसापासून कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज मिळावी यासाठी आज सायंकाळी 6 ते रात्री 11 या विजेच्या 'पिक-अवर' मध्ये सोशल मिडीयावर #विजेचा_बळी_राजा ही हॅशटॅग मोहिम चालवली जाणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, दुसरीकडे राज्यभरात शेतीपंपाची विजतोडणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्याचासुद्धा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी सायंकाळी 6 ते रात्री 11 यावेळेत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मिडीयावर #विजेचा_बळी_राजा हॅशटॅ वापरुन सरकारचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती करा इत्यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, बेमुदत धरणे आंदोलनाच्या सहाव्या दिवशी आंदोलनस्थळी असणाऱ्या शेतकऱ्यांना जेवणासाठी विविध ठिकाहून डबे येत आहेत. तसेच शेतकरी देखील या आंदोलनाला मोठा पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसत आहे. आमची मागणी एवढीच आहे की, शेतकऱ्यांना रात्री 8 ते पहाटे 4 या वेळात वीज देऊ नका. त्यांना हा रात्रीचा वेळ सोडून कधीही वीज द्या. कारण या वेळात शेतकऱ्यांवर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच उष्णतेमुळे साप बाहेर येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री सर्पदंश होण्याची भिती आहे. सर्पदंशाने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे स्वाभिमानी शेतकरी सघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे. एकीकडे खासगी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू असून, दुसरीकडे शासनाचे प्रकल्प बंद पाडण्याचे काम सुरू आहे. यातून शेतकऱ्यांची गोची करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: