strawberry farming : स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला लगेच महाबळेश्वर आठवतं. पण चक्क मराठवाड्यामध्ये आता स्ट्रॉबेरीची शेती करण्यात येत आहे. त्यातही अवर्षणग्रस्त भूभाग अशी ओळख असलेल्या बीडमध्ये स्ट्रॉबेरीची शेतीचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्याने केला आहे. सध्या जमिनीचे तापमान वाढू लागले आहे. अशा वातावरणात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन गेतले आहे. 


स्ट्रॉबेरीची यशस्वी शेतीची किमया ही परळी जवळच्या परचुंडीमधील एका तरुण शेतकऱ्याने करुन दाखवली आहे. सुगंध रुपनर असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.  सोयाबीन, कापसाची शेती करणारा हा शेतकरी आता मात्र स्ट्रॉबेरीची शेती करु लागला आहे. सुगंध रुपनर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड केली होती. स्ट्रॉबेरी हे थंड प्रदेशात येणारे पीक आपल्या शेतात येईल का? हा प्रश्‍न सुगंध रुपनवर यांना सतावत होता. यावर त्यांनी उत्तर शोधलं आणि स्वतःच्या शेतामध्ये बारा गुंठ्यात मल्चिंगवर स्ट्रॉबेरीची लागवड केली.


स्ट्रॉबेरीच्या फळाचं वजन वाढावं आणि जमिनीत ओलावा टिकून राहावा यासाठी मल्चिंग आणि ठिबकच्या दोन लाईन टाकण्यात आल्या आहेत. उन्हापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करण्यात आला आहे. या स्ट्रॉबेरीची लागवड 25 डिसेंबरला केली होती. त्यासाठी सहा हजार रोपं त्यांना लागली आहेत. रोपांसाठी 54 हजार रुपये तर ठिबक मल्चिंग आणि क्रॉप कव्हर यासाठी त्यांना एकूण 75 हजार रुपयांचा खर्च आला आहे. सध्या स्ट्रॉबेरीची विक्री परळी, अंबाजोगाई आणि बीड या ठिकाणी केली जात आहे. या स्ट्रॉबेरीला 250 रुपयांचा भाव मिळत आहे. चार महिन्याच्या या स्ट्रॉबेरीच्या पिकातून त्यांना दीड लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांची स्ट्रॉबेरीची शेती बघायला पंचक्रोशीतील अनेक लोक येत आहेत. आधी तर बीडमध्ये स्ट्रॉबेरी पिकते यावरच शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता, आता मात्र या स्ट्रॉबेरी शेतीची माहिती पंचक्रोशीत पोहोचली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागातून शेतकरी स्ट्रॉबेरी शेती बघायला येत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: