Maharashtra Latur News: लातूर (Latur News) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Latur Agricultural Produce Market Committee) दररोज सोयाबीनचे (Soybean Crop) तीस ते चाळीस हजार कट्टे येत आहेत. सोयाबीनचा दर दररोज वाढताना दिसतोय. मात्र सोयाबीनची आवकही कमी होताना दिसत आहे. येणाऱ्या काळात उच्चांकी दर मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी (Farmers) सोयाबीन बाजारात आणलंच नाही.


शेती उत्पादनात कमी-जास्तप्रमाण झालं तरी शेतकऱ्यांचं अर्थकारण हे बाजारपेठेवरच अवलंबून असतं. यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असली, तरी दिवसागणिस दरात वाढ होत असल्यानं बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचं अर्थकारण हे सोयाबीन या मुख्य पिकावरच अवलंबून आहे. कमी उत्पादनामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या 20 दिवसांमध्ये क्विंटलमागे 600 रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या दरांमुळे गेल्या आठवड्यात लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.


दिवाळीमुळे गेल्या 5 दिवसांपासून बाजार समितीमधील व्यवहार ठप्प होते. पाडव्याला मुहूर्ताचे दर निघाले मात्र, भाऊबीजला पुन्हा बाजार बंद होता. त्यामुळे गुरुवारी सोयाबीनचे दर आणि आवक काय राहणार याकडे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागलं होतं. गुरुवारी सकाळपासूनच बाजार समिती परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्या आजमितीलाही सुरूच आहेत.


भाव असूनही दिवाळीच्या तुलनेत आवक कमी 


लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती देशात सोयाबीनची मोठी बाजारपेठ म्हणून चर्चित आहे. लातूर जिल्ह्यातूनच नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्रातूनही सोयाबीन उत्पादक शेतकरी लातूर बाजारपेठेत येत असतात. दिवाळीमध्ये आर्थिक निकड असल्याकारणानं दररोज एक लाख सोयाबीनचे कट्टे इथे दाखल होत होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजारभावाकडे त्या पद्धतीनं लक्ष नव्हतं. मात्र मागील चार दिवसांपासून सोयाबीनची आवक ही 30 ते 40 हजार कट्टे दररोजची आहे. 5170 ते 5200 या दरांत सोयाबीनची विक्री होताना दिसत आहे. भाव वाढलेला असतानासुद्धा दिवाळीच्या तुलनेत आवक मात्र कमी आहे.


"आर्थिक कुवत असेल, तर शेतकऱ्यांनी सोयाबीन होल्ड करुन ठेवावं"


येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढणं निश्चित आहे, असं व्यापाऱ्यांचं मत आहे. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक कुवत असेल त्यांनी सोयाबीन होल्ड करून ठेवावं. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन तारण योजनेचा लाभ घ्यावा. आवश्यकता असेल तेवढंच सोयाबीन विकून बाकी सोयाबीन शिल्लक ठेवावं, ज्याद्वारे योग्य भाव मिळाल्यानंतर ते विक्री करता येईल. यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असा सल्ला लातूरचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.