Solapur Barshi Surdi Village : बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने तिसरा क्रमांक पटकावत जल पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये बार्शीतल्या सुर्डीचाही समावेश आहे. 



पाणी फाऊंडेशनच्या माध्यामातून केलेल्या कामामुळे गावाच्या पाणी समस्येत अमुलाग्र बदल झाल्याची प्रतिक्रिया सुर्डीकरांनी दिली. 2019 साली पाणी फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत सुर्डी गावाला पहिला पारितोषिक प्राप्त झालं होतं. मात्र या पुरस्कारनंतर देखील गावाने जलसंधारणाचे काम सुरुच ठेवले होते. "मागील तीन वर्षापूर्वी गावात पाण्याची परिस्थिती फार विदारक होती. जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी टॅंकरद्वारे मागवावे लागत होते. पिण्याची पाण्याची तर फारच बिकट परिस्थिती होती. अशात पाणी फाऊंडेशनने स्पर्धा जाहीर केली. यामध्ये गावातील 20 लोकांनी प्रशिक्षण घेतले. गावाचा हा प्रश्न हा कायमचा सोडवण्यासाठी संपूर्ण गावाने दीड महिने प्रंचड मेहनत घेतली. पहिल्या वर्षी पुरस्कार मिळाला मात्र पाऊस नव्हता. मात्र आता जानेवारी महिन्यात देखील गावाच्या ओढ्याला पाणी आहे. आधी याच ओढ्यात दिवाळीनंतर पाणी पाहायला मिळत नव्हते. गावाने घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे" अशी प्रतिक्रिया सुर्डीचे पाणी फाऊंडेशन प्रमुख मधुकर डोईफोडे यांनी दिली. 

 

"गावामध्ये द्राक्ष बागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते. सलग दोन तीन वर्ष दुष्काळ पडल्यामुळे बागा जगवायच्या कशा हा प्रश्न संपूर्ण गावासमोर उभा होता. बागा जगवण्यासाठी पाणी विकत आणावे लागत होते. पाणी विकत घेतल्यामुळे शेती परवडत देखील नव्हती. मात्र गावाने एकत्रित येऊन जलसंधारणाचे काम केले. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण या कामात सहभागी झाले. जिद्दीने काम केल्याने मोठा फायदा गावाला झाला. पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर देखील गावाने पाण्याचा अपव्यय केला नाही. पाण्याचा नियोजनबद्ध वापर केला. वाटर बजट ठरवण्यात आले. त्यानुसार ड्रिप, स्प्रिंक्लर इत्यादीचा वापर वाढवल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली." अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ अभिनंदन शेळके  यांनी दिली. 

 

सुर्डीने केलेले काम सोलापूर जिल्हाला दिशादर्शक - दिलीप स्वामी, मुख्य कार्य़कारी अधिकारी

 

"पाणी व्यवस्थापनाबाबत सुर्डी गावाने केलेले काम हे संपूर्ण जिल्हाला दिशादर्शक ठरले आहे. जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनसाठी 100 दिवसाचे अभियान सध्या सुरु आहे. या अभियानात देखील सुर्डी गावाने चांगले काम केले आहे. शोषखड्डे घेऊन सांडपाणी व्यवस्थापन गावातर्फे केले जात आहे. सुर्डी ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी केलेले प्रय़त्न भूषणावह आहेत." अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य़कारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 


 


2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे. जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्य़ाची दखल घेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने 2020 या वर्षासाठी पुरस्कार जाहीर कऱण्यात आले. यामध्ये विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तींना 11  श्रेणींमध्ये एकूण 57 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्राला या पुरस्कारांमध्ये एकूण चार पुरस्कार जाहीर झाले.

 

सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट तीन संस्थांची निवड करण्यात आली असून यात रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये पश्चिम विभागातून निवड करण्यात आलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी  ग्रामपंचयातीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी  देशातून तीन गैर शासकीय संस्थांची निवड करण्यात आली असून या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha