Sanyukt Kisan Morcha Protest : संयुक्त किसान मोर्चानं (Sanyukt Kisan Morcha) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन सुरु आहे. शहीद उधम सिंग यांच्या हुतात्मा दिनानिमित्त हे आंदोलन सुरु आहे. या चक्का जाम आंदोलनाला पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.


या मागण्यांसाठी आंदोलन 


किमान आधारभूत किंमतीच्या बाबतीत केंद्र सरकारनं आश्वासनं दिलं होतं. मात्र, ते आश्वासन सरकारनं पू्ण केलं नाही. तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे देखील अद्याप मागे घेतली नाहीत या मुद्यावर संयुक्त किसान मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा, बेकायदेशीर कारवाई करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना जामीन मिळावा,  शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, या मागण्या संयुक्त किसान मोर्चाने केल्या आहेत. 




दुपारी  तीन वाजेपर्यंत आंदोलन सुरु राहणार 


एमएसपी कायदा हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र, केंद्र सरकार माघार घेत आहे. पण शेतकरी त्यांचा हक्क घेणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी म्हटले आहे. या चक्का जाममुळं सर्वसामान्यांना कोणतीही अडचण होणार नाही किंवा अत्यावश्यक सेवाही विस्कळीत होणार नसल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत आजचे धरणे आंदोलन सुरु राहणार आहे. 


पोलिसांचा चोख बंदोबस्त


दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाचा प्रभाव असलेल्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्याची पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे रद्द केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने त्यावेळी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: