Rice Sowing : सध्या देशातील काही राज्यांमध्ये चांगला पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे, तर दुसरीकडे काही राज्यात अल्प पाऊस झाला आहे. अनेक राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, या कमी पावसाचा परिणाम भाताच्या पेरणीर (Rice sowing) झाला आहे. यावर्षी भाताच्या लागवडीत घट झाली आहे. चालू खरीप हंगामात भाताची लागवड 5 ऑगस्टपर्यंत 13 टक्के घसरली आहे. त्यामुळं तांदळाच्या उत्पादनात (Rice production) घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भात लागवडीत मोठी घट


दरम्यान, कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 5 ऑगस्ट 2022 पर्यंत देशात 274.30 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 314.14 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. यावर्षी मात्र, यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसत आहे. सर्वात मोठे धान उत्पादक राज्य असलेल्या पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कमी भाताचे क्षेत्र नोंदवले गेले आहे. दरम्यान, 8 ऑगस्टपर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशात 36 टक्के पावसाची कमतरता आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशात 43 टक्के पावसाची कमतरता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये अनुक्रमे 38 टक्के आणि 45 टक्के पावसाची कमतरता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये ४६ टक्के पाऊस कमी झाला आहे.


भारत हा तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा हा 40 टक्के आहे. तांदूळ उत्पादनात घट झाल्यामुळं जगभरातील व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे. केंद्राकडे 1 जुलैपर्यंत 47 दशलक्ष टन तांदळाचा साठा आहे. 


तांदळाच्या उत्पादन घट होण्याच्या भितीनं व्यापारी चिंतेत


तांदळाच्या उत्पादनात घट होण्याच्या भितीनं व्यापारी देखील चिंतेत आहे. भारतात आधीच महागाई वाढली आहे. त्यामुळं निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भाताची पेरणी कमी झाल्यामुळं देशात तांदळाची टंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळं सरकार पुन्हा तांदळाची निर्यात थांबवण्याची शक्यता आहे. दरम्यान, जगातील एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे. भारत सरकारने यापूर्वीच गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून स्थानिक बाजारपेठेतील किमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: