Sugarcane News : मे महिना सुरु झाला तरी अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊस शिल्लक आहे. अतिरीक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. अतिरीक्त उसाच्या प्रश्नावर अहमदनगरचे जिल्हाधिकरी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी शेजारच्या कारखान्यांवर देण्यात आली आहे.
 
सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. जिल्ह्याच्या उत्तर भागात राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या तीन तालुक्यांत उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदा जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 2 लाख 25 हजार मेट्रिक टन ऊस आहे. यापैकी 1 लाख 40 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप आतापर्यंत झाले आहे. तर 80 हजार मेट्रिक टन अतिरिक्त उसाचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कमी अधिक प्रमाणात इतरही तालुक्यातही अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हाधिकरी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत अतिरिक्त ऊस गाळपाबाबत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी ही शेजारील कारखान्यांवर विभागून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी भोसले हे राज्याच्या साखर आयुक्तांना सादर करणार आहेत. 6 जूनपर्यंत गळीत हंगाम बंद करू नये, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत.


दरम्यान, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 30 एप्रिलला खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस गाळपाबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.
 
1 कोटी 73 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण


सध्या जिल्ह्यात 14 सहकारी आणि 9 खासगी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 कोटी 73 लाख 30 हजार 13 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर 1 कोटी 73 लाख 49 हजार 828 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा सरासरी उतारा 10.1 टक्के आहे.


नगरमधील 'या' कारखान्यांवर गाळपाची जबाबदारी


जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत अतिरिक्त उसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर यांच्यावर 30 हजार मेट्रिक टन अतिरिक्त उसाच्या गाळपाची जबाबदारी देण्यात आली, तर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर या कारखान्यावर 25 हजार मेट्रिक टन, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी 25 मेट्रिक टन उसाचे गाळप करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे कारखान्यांना मजूर उपलब्ध होत नाहीत. अशावेळी ज्या कारखान्याने गाळप बंद केले आहे, त्या साखर कारखान्यांकडील हार्वेस्टर आणून ऊसाची तोडणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. नगरमधील क्रांती शुगर, जय श्रीराम, राहुरी या कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस गाळप पूर्ण झाल्याने त्यांनी गाळप बंद केले आहे. तर कुकडी, श्रीगोंदा, पियूष, अंबालिका आणि युटेक या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या गाळप पूर्ण होत आले आहे.


यंदा राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. उसाचं क्षेत्र वाढल्याने यावर्षी राज्यात विक्रमी गाळप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मे महिना पूर्ण कारखाने सुरु राहणार आहेत. अद्याप राज्यात 30 ते 33 लाख टनाच्या आसपास ऊसाचे गाळप शिल्लक राहिले आहे. त्यामुळे साधारणत 10 जूनपर्यंत काही साखर कारखाने सुरु राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: