Pik Vima News: डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला होता. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला होता. विशेषत: फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता. या अवकाळी पावसामुळं नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका बसला होता. यावेळी फळ उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकांचा पिक विमा काढला होता. या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पिक विम्याची रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न ABP माझाने लावून धरला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 


हेक्टरी 43 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई 


नंदुरबार जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे केळीआणि पपई बागांना मोठा फटका बसला होता. यावेळी शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून पिक विमा काढला होता. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्याकडे पाठपुरवा केला होता. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न ABP माझाने लावून धरल्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. विमा कंपनीने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे. संबधित विमा कंपनीने 2 कोटी 98 लाखाची मदत देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 43 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळत असल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ABP माझाचे आभार मानले आहेत. 


प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश 


शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसान. या झालेल्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. नैसर्गीक संकटाचा दरवर्षी शेतकऱ्यांना फटका बसतो. शेतकऱ्यांची उभी पिकं यामुळं वाया जातात. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सरकारने सुरु केली आहे. 


'या' कारणामुळं झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण


हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळं पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळं होणारं नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळं पिकांचं होणारं नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गीक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाते.  


महत्वाच्या बातम्या:


शेतकरी पीकविमा योजना नेमकी काय? लाभ कसा घ्यायचा, तुम्हाला पैसे कसे मिळतील?