Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास बंदी आहे. मात्र, असे असतानाही शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. याप्रकरणी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सहा पुजाऱ्यांवर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मंदिरातील सहा पुजारी तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहेत. 


जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाप्रमाणे तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. प्रवेशास बंदी असतानाही खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन गेण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे थेट जिल्ह्याधिकाऱ्यांनी सहा पुजाऱ्यांना निलंबीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार तुळजाभवानीच्या मुर्तीची जपणूक करण्याची गरज असून, असे असतानासुद्धा याचे उल्लंघन झाल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. खासदार आणि आमदारांना अनाधिकृतपणे मंदिरातील गाभार्‍यात नेऊन दर्शन दिल्याप्रकरणी पुजाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून, मंदिर सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये चार पुजाऱ्यांवर सहा महिन्यांसाठी तर दोन पुजाऱ्यांना तीन महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.


नेमकं झालं काय?


काही महिन्यांपूर्वी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा प्रतिबंधक केलेला आहे. 21 फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे कार्यकर्त्यांसह तुळजाभवानीच्या दर्शनाला गेले. त्यावेळेला भोपे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम परमेश्वर आणि इतर तीन पुजारी यांनी मंदिराच्या सुरक्षारक्षकांना गाभार्‍याचा दरवाजा उघडायला सांगितला. या सुरक्षारक्षकांनी त्यांना चावी द्यायला नकार दिलां, यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देवीला कुंकू लावायचे आहे असं सांगितलं. या पुजाऱ्यांना या सुरक्षारक्षकांनी दमदाटी केली. त्यांच्याकडून चावी घेऊन कुलूप उघडलं. त्यानंतर पुजारी आणि इतर मंडळी खासदार आणि आमदारांना घेऊन गाभार्‍याच्या आतमध्ये गेले. त्यामुळे गाभाऱ्यात आणि चोपदार दरवाजा इथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. मंदिरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असा जिल्हाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. या कारणामुळे तुळजाभवानी मंदिरात अनधिकृत प्रवेश देऊन दर्शन घडवले याची चर्चा सुरू झाली.  जिल्हाधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाच्या कारवाईचा निर्णय घेतला. 


दरम्यान, तहसीलदार तथा प्रशासक योगिता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे सहा पुजाऱ्यांवरती मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. मंदिर संस्थानच्या वतीने भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, पुजारी विनोद सुनील कदम, गजानन किरण कदम, सचिन वसंत अमृतराव यांच्यावर देऊळ कवायत कलम 24 व 25 प्रमाणे सहा महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. 


मंदिर प्रवेश बंदी पुढचे बारा महिन्यापर्यंत कायम करू का करू नये अशी नोटीस सुद्धा मंदिर प्रशासनाने या चौघांना दिली आहे. या सर्वांना सात दिवसात खुलासा देण्याचे आदेश देण्यात आलेत. तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा रक्षक यांच्याशी हुज्जत घातली, शिवीगाळ केली, धमकी दिली, प्रशासकीय कामात व्यत्यय आणला, दर्शन रांगेत भाविक घुसवून गोंधळ घातला प्रकरणी मंदिर संस्थांना पुजारी अरविंद भोसले आणि ओमकार इंगळे यांना तीन महिने मंदिरात प्रवेश बंदी केली आहे.  तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात सकाळी आणि संध्याकाळी पूजेनंतर केवळ मंहत, पाळीवाले पुजारी यांनाच प्रवेश दिला जातो. इतर भक्त व पुजारी यांनी चोपदार दरवाजा येथून दर्शन घ्यावं, त्यांना मुख्य गाभार्‍यात जाऊ देऊ नये असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. या आदेशाचेही पुजारी सुधीर कदम यांनी उल्लंघन केलं. पाळी नसताना मंदिर गाभार्‍यात दमदाटी केली. दमदाटी करून प्रवेश मिळवला त्यामुळे त्यांना पुढील तीन महिने मंदिर प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणात ही दोन स्वतंत्र कारवाई आहे.


महत्त्वाच्या बातम्या: