Subsidy On Farm Pond : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना (Farmers) प्रोत्साहन दिलं जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात आहे. अशातच राजस्थान सरकारनं (Rajasthan Govt) शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना आता एक लाख 10 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पहिले शेतकऱ्यांना 90 हजार रुपयांचे अनुदान दिलं जात होते. 


अर्थसंकल्पात केली तरतूद 


पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक राज्य सरकारे सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देत आहेत. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना ठिबक, स्प्रिंकलर आणि पोर्टेबल सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी अनुदानही दिले जात आहे. भूजल पातळी कमी होत असताना, उत्तर प्रदेश आणि राजस्थानची राज्य सरकारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात तलाव तयार करण्यास प्रवृत्त करत आहेत. नुकत्याच सादर करण्यात केलेल्या अर्थसंकल्पात, राजस्थान सरकारनं शेततळ्यांच्या बांधकामाच्या खर्चावर अनुदानाच्या रकमेतही वाढ केली आहे. यामुळं लागवडीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देता येतील.


राजस्थानची बहुतेक जमीन नापीक आणि वालुकामय


आतापर्यंत राजस्थानमधील शेतकऱ्यांना शेततळे बनवण्यासाठी 90 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र, यंदापासून नवीन अर्जदारांना 1 लाख 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. राजस्थानची बहुतेक जमीन नापीक आणि वालुकामय आहे. कारण त्या ठिकाणी पाण्याची मोठी कमतरता आहे. या समस्येवर मात करून नापीक जमीन पुन्हा शेतीयोग्य बनवण्यासाठी शेततळे करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शेततळ्यांसोबतच शेतकरी त्यांच्या नापीक शेतात सोलर प्लांट किंवा सोलर पंप लावू शकतात, ज्यामुळं शेतीसोबतच उत्पन्नही मिळेल.


 या शेतकऱ्यांना मिळणार लाभ 


कोणताही शेतकरी किमान 400 घनमीटर ते कमाल 1200 घनमीटरपर्यंत शेततळे बांधी शकतो. 
तसेच लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान 0.3 हेक्टर जमीन असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांचे शेत दाट लोकवस्तीचे असल्यास किंवा रस्त्याच्या कडेला असल्यास अशा ठिकाणांपासून 50 फूट अंतरावर तलाव बांधून घ्यावा. 


शेतकऱ्यांना दिलासा


दरम्यान, देशातील वेगवेगळी राज्य सरकरे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. यातून ते शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहेत. यामाध्यमातून शेतकऱ्यांना एका प्रकारे दिलासा मिळत आहे. अशातच शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ करुन राजस्थान सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Lumpy Virus : राजस्थान सरकारचा मोठा निर्णय, लम्पीमुळं जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार 40 हजारांची मदत; पशुपालकांना दिलासा