Elections : देशाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छावणी परिषदेच्या निवडणुकीबाबत (Cantonment Boards Election) अधिसूचना जारी केली. त्यामुळे अखेर छावणी परिषदेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. संरक्षण मंत्रालयाने या निवडणुकीसाठी 30 एप्रिल ही तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad News) छावणी परिषदेच्या 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.


औरंगाबाद छावणी परिषदेची याआधीची निवडणूक जानेवारी 2015 साली झाली होती. त्यानंतर लोकनियुक्त सदस्यांची मुदत जानेवारी 2020 मध्ये संपली होती. त्यामुळे छावणी परिषदवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. तर गेली तीन वर्षे औरंगाबाद छावणी परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती आहे.


लष्करतळाचे ब्रिगेडिअर छावणी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर लोकनियुक्त सदस्यांमधून उपाध्यक्षांची निवड केली जाते. लोकनियुक्त सदस्य नसल्याने मध्यंतरी अध्यक्ष आणि सीईओ हेच कारभार पाहत होते. गतवर्षी शासनाने प्रशांत तारगे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अध्यक्ष, सीईओ आणि नामनिर्देशित सदस्य अशा तिघा जणांकडून छावणी परिषदेचा कारभार सुरू होता. आता येत्या 30 एप्रिल रोजी छावणी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तर संरक्षण मंत्रालयाने देशातील 57 छावणी परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. ज्यात राज्यातील औरंगाबाद, अहमदनगर, दे-वळाली, खडकी आणि पुणे या छावणी परिषदांचा समावेश आहे.


राजकीय पक्षांची परीक्षा


औरंगाबाद छावणी परिषदेचा राजकीय इतिहास पाहिला तर, आतापर्यंत औरंगाबाद छावणी परिषदेत भाजप- शिवसेना युतीचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर छावणीच्या या पहिल्याच निवडणुका आहे. त्यामुळे शिंदे-ठाकरे गटासह भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे.


देशभरातील 57 छावणी परिषदेच्या निवडणुका 


आग्रा,अहमदाबाद, अहमदनगर, अजमेर, इलाहाबाद, अल्मोडा, अमृतसर, औरंगाबाद आयोध्या, बबीना, बदामीबाग, बकलोह, बरेली, बैरकपुर, बेलगाम,कन्नूर, चकराता, क्लेमेंट टाउन, दगशाई, डलहौजी, दानापूर, देहरादून, देवलाली, फतेहगढ, फेरोजपूर, जबलपूर, जालंधर, जलापहाड, जम्मू, झांसी, जतोग, कामठी, कानपूर, कसौली, खडकी, लंढोर, लैंसडाऊन, लेबांग, लखनऊ, मथुरा,मेरठ, महू, मोरार, नैनिताल, नसीराबाद, पुणे, रामगढ, राणीखेत, रुडकी, सागर, सिकंदराबाद, शहाजानपूर, शिलांग, सेंट थॉमस माउंट-कम पल्लवरम.