Punjab Farmers Protest : पंजाबमधील शेतकरी संघटना (punjab farmers organization) पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी (Farmers) पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाची देणी न दिल्यामुळं शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरु आहे.  गोल्डन संधार शुगर मिल्स लिमिटेडकडून शेतकऱ्यांना सुमारे 72 कोटी रुपये येणं बाकी आहे. या पैशांच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली-अमृतसर महामार्गाच्या (Delhi-Amritsar Highway) एका लेनवर आंदोलन सुरु केलं आहे.


उसाचे बील न दिल्याच्या मागणीवरुन पंजाबमधील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 72 कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे थकली आहे. तसेच 2019-20 मध्ये 30 कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. अद्याप ते पैसे शेकऱ्यांना मिळाले नाहीत. तसेच 2020-2021 मध्ये सात कोटी रुपयांची थकबाकी, 2021-2022 मध्ये त्यांच्याकडे 35 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
या पैशांची मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांची देणी न दिल्यास देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिली आहे. 


पंजाबमधील चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे हजारो रुपये थकवले आहेत. उसाचा हंगाम संपल्याने साखर कारखाने बंद आहेत. याबाबत गिरणी मालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. सुखबीर सिंग संदार हे सध्या मिलचे विद्यमान मालक आहेत. यापूर्वी मिलमध्ये तीन भागधारक होते. सुखबीर सिंग संदार, जर्नेलसिंग वाहिद, जसविंदर सिंग बैंस हे भागधारक होते. सुखबीर सिंग संदार सध्या इंग्लंडमध्ये आहेत. जर्नेल सिंग वाहिद हे अकाली दलाच्या संबंधीत आहेत. त्यांनी 2017 मध्ये त्यांनी नवनशहरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.


संयुक्त किसान मोर्चाही आक्रमक


दरम्यान,  संयुक्त किसान मोर्चा देखील पुन्हा आक्रमक झाला आहे. विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून 31 जुलैला आंदोलन करण्यात आलं होतं. देशातील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होते. या आंदोलनाला पंजाबमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. किमान आधारभूत किंमतीच्या बाबतीत केंद्र सरकारनं आश्वासनं दिलं होतं. मात्र, ते आश्वासन सरकारनं पू्ण केलं नाही. तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे देखील अद्याप मागे घेतली नाहीत या मुद्यावर संयुक्त किसान मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा, बेकायदेशीर कारवाई करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना जामीन मिळावा,  शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, या मागण्या संयुक्त किसान मोर्चाने केल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: