PM Modi : गुजरातमधील सुरतमध्ये आज नैसर्गिक शेती परिषद होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM  Narendra Modi ) संबोधित करणार आहेत. या परिषदेत असे हजारो शेतकरी आणि भागिदार सहभागी होणार आहेत. ज्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करुन यशोगाथा लिहली असे शेतकरी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह राज्यपाल देखील उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी साडे अकरा वाजता पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे नैसर्गिक शेती परिषदेला संबोधित करणार आहेत.


पंतप्रधानांच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी मार्च 2022 मध्ये झालेल्या गुजरात पंचायत महासंमेलनात प्रत्येक गावातल्या कमीत कमी 75 शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करावी असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सुरत जिल्ह्याने पुढाकार घेतला होता. तसेच अथक प्रयत्न करुन पंतप्रधानाचे हे स्वप्न वास्तवात आणले आहे. नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकरी वर्गाला प्रवृत्त करण्यासाठी सुरत शहराने शेतकरी संघटना, तलाठी, कृषी उत्पन्न बाजार समित्या (APMCs), सहकारी बँका या क्षेत्राशी निगडीत भागीदार, शेती उद्योग आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यांना  शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करायला सांगीतले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रापंचायतीमधून कमीत कमी 75 शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना  प्रशिक्षण देऊन नैसर्गिक शेतीसाठी करण्यासाठी प्रवृत्त केले होते. या शेतकऱ्यांना 90 वेगवेगळ्या समूहात प्रशिक्षण देण्यात आले होते. सूरत जिल्ह्यात 41,000 शेतकरी नैसर्गिक शेतीसाठी तयार झाले. 


नैसर्गिक शेतीमुळं शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत


आज सूरत इथे होणाऱ्या नैसर्गिक शेती परिषदेला हजारो शेतकरी आणि भागिदार सहभागी होणार आहेत. ज्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करुन यशोगाथा लिहीली असे शेतकरी देखील सहभागी होणार आहेत. नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे. या पद्धतीत सर्वच संसाधने नैसर्गिक पदार्थांपासून बनवली जातात. जे सहजासहजी आपल्या आसपास उपलब्ध आहेत. रासायनिक खते, तणनाशके, ट्रॅक्टरने खोल नांगरणी यामुळं अतोनात झालेली जमीनीची झीज केवळ नैसर्गिक शेती पद्धतीनेच भरुन काढली जाऊ शकते. जगभरात नैसर्गिक शेती विविध प्रकारांनी केली जाते. स्थानिक वातावरणीय व भौगोलिक परीस्थितीनुसार वापरली जाणारी संसाधने व पद्धती वेगवेगळी असू शकतात पण या सर्वांचा उद्देश व परीणाम एकच आहे तो म्हणजे विषमुक्त दर्जेदार अन्न उत्पादन करणे. नैसर्गिक शेतीमुळं शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते. तसेच नैसर्गिक निविष्टांमुळे पीक निरोगी आणि उत्पादन भरपूर मिळते.