PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 1 ते 10 ऑगस्ट 20222 पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी करणे,  आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडणे, एकूण लाभार्थ्यांच्या 10 टक्के व स्वयंनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची 100 टक्के तपासणी कृषी मित्रांमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य असून, त्याशिवाय यापुढील लाभाचे हप्ते लाभार्थ्यास मिळणार नाहीत. 


31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करा


दरम्यान, या मोहिमेच्या माध्यमातून ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार आहेत. शिवाय या याद्या चावडीवर अथवा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार आहेत. प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांना पोलीस पाटील, कोतवाल व सरपंच यांच्यामार्फत संपर्क करुन ई-केवायसी पूर्ण करण्याचे महत्व व कार्यपद्धती समजावण्यात येईल व मोबाईलद्वारे प्रक्रीया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यात येईल.


पुणे जिल्ह्यातील आज अखेर प्रलंबीत असलेल्या लाभार्थ्यांना आधारकार्ड बँक खात्याशी जोडण्याबाबत माहिती देण्यासाठी त्यांची यादी चावडीवर अथवा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. वरील दोन्ही प्रक्रीया पूर्ण करण्याबाबत लाभार्थ्यांना संपर्क करण्याचे निर्देश क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 2021-22 मधील 10 टक्के लाभार्थ्यांची तपासणी कृषी मित्रांद्वारे करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय समितीच्या बैठकीत आत्मा योजनेच्या ब्लॉक टेकनॉलॉजी मॅनेजरच्या मार्गदर्शनाखाली कृषी मित्रामार्फत लाभार्थ्यांच्या प्रलंबित तपासणी प्रपत्र संकलनाचे काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


स्वयंनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची 100 टक्के तपासणी


कृषीमित्रांनी आत्मा योजनेचे बीटीएम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष गावात जाऊन 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक खाते पासबुक आदी कागदपत्रे संबंधीत शेतकऱ्यांकडून प्राप्त करुन घेत संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून प्रपत्र- 1 प्रमाणित करुन घ्यावे. याच पद्धतीने स्वयंनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची 100 टक्के तपासणी कृषी मित्रांद्वारे करण्यात यावी. या कामावर देखरेख व काम करुन घेण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीची राहील, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख  यांनी दिले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी वंचित नविन लाभार्थी यादीस 15 ऑगस्ट 2022 च्या ग्रामसभेत विशेष बाब म्हणून मान्यता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: