Rice sowing : देशातील काही राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस (Rain) झाला आहे, तर काही ठिकाणी मात्र, पावसानं दडी मारली आहे. त्याचा शेती क्षेत्रावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. पावसाच्या कमतरतेमुळं काही राज्यात चालू खरीप हंगामात भाताच्या लागवडीत (Rice sowing) घट झाली आहे. या खरीप हंगामात भाताचे लावडीत 5.99 टक्क्यांची घट झाली आहे. यावर्षी 367.55 लाख हेक्टरवर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. तर दुसरीकडं घट होऊनही भाताच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या देशाच्या विविध भागात पावसानं दडी मारली आहे. अनेक ठिकाणी समाधनाकराक पाऊस झाला नाही. पावसाच्या कमतरतेमुळं भाताच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली होती. मागल वर्षीचा विचार केला तर 390.99 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी झाली होती. मात्र, त्यामध्ये यावर्षी घट झाली असून 367.55 लाख हेक्टरवर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. भात हे मुख्य खरीप पीक आहे. जूनमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपासूनच भात पेरणी सुरू होते. ऑक्टोबर महिन्यापासून भाताची कापणी सुरू होते.
कोणत्या राज्यात किती उत्पादन घटले
दरम्यान, कृषी मंत्रालयानं दिलेल्या महितीनुसार, झारखंडमध्ये यावर्षी कमी भाताचे क्षेत्र नोंदवले गेले आहे. झारखंडमध्ये 10.51 लाख हेक्टर, पश्चिम बंगालमध्ये (4.62 लाख हेक्टर), छत्तीसगड (3.45 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (2.63 लाख हेक्टर), बिहार (2.40 लाख हेक्टर) आणि ओडिशा (2.24 लाख हेक्टर) क्षेत्र कमी झाले आहे. त्याचबरोबर आसाम (0.49 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.46), हरियाणा (0..44 लाख हेक्टर), त्रिपुरा (0.22 लाख हेक्टर), नागालँड (0.21 लाख हेक्टर), मेघालय (0.18 लाख हेक्टर) भाताचे पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. तर पंजाबमध्ये (0.12 लाख हेक्टर), महाराष्ट्र (0.07 लाख हेक्टर), जम्मू आणि काश्मीर (0.05 लाख हेक्टर), गोवा (0.03 लाख हेक्टर), मिझोराम (0.03 लाख हेक्टर) आणि सिक्कीम (0.02 लाख हेक्टर) भाताची कमी लागवड झाली आहे.
पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची कमतरता
भाताशिवाय एकूण कडधान्य क्षेत्रात देखील 4.95 टक्क्यांची घट झाली आहे. कडधान्याचे उत्पादन 127.71 लाख हेक्टर झाले आहे. जे मागील वर्षीच्या कालावधीत 134.37 लाख हेक्टर होते. तर भरड धान्यासह पोषक तृणधान्यांचे उत्पादन वाढले आहे. 169.39 लाख हेक्टरवरून ते उत्पादन 176.33 लाख हेक्टर इतके झाले आहे. तर नगदी पिकांमध्ये कपाशीचे क्षेत्र 124.55 लाख हेक्टरवर राहिले आहे. तसेच उसाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार देशात 24 ऑगस्टपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस 9 टक्के जास्त झाला आहे. मात्र, पूर्व आणि ईशान्य भारतात याच कालावधीत 19 टक्के पाऊस कमी झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: