Onion Price : सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कांद्यांच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी 25 रुपये प्रति किलोचा भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकदिवसीय आंदोलन देखील केले होते. मात्र, या आंदोलनानंतर देखील शासन स्तरावरुन कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
 
उत्पादन खर्च वाढला असताना कांद्याचा दर वाढला नाही


कांदा हे नाशवंत पीक असल्यानं उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्यास शेतकऱ्यांचा भांडवली खर्च निघू शकतो. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो 20 ते 22 रुपये येत असताना त्यात सरासरी आठ ते दहा रुपये इतका कमी दर मिळत आहे. यामुळं कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे.  मात्र, मागणी करुनही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात न आल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी 25 रुपये प्रति किलोचा दर द्यावा तसेच खर्चाच्या तुलनेत कांद्याला अपेक्षित बाजार भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


वातावरणाच्या बदलाचा कांद्याला मोठा फटका


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत साठवला असून, वातावरणाच्या बदलामुळं कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे बाजार समितीतही कांद्याला मातीमोल किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. यामुळं शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवरच पोळ्याचा सण येऊन ठेपला आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा सण साजरा करायचा तरी कसा असा महत्त्वाचा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. 


महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाही आक्रमक


गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळं कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं (Maharashtra State onion Farmers Association) व्यक्त केलं आहे. कांद्याला सरासरी 25 रुपये प्रतिकिलो दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: